संगमेश्वर :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या उत्सवाची मोठ्यांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता आहे. गणरायाचे आगमन होण्यापूर्वी बाजारपेठा सजायला लागतात. यामध्ये मुख्य आकर्षण असते ते बाप्पाच्या मूर्तीचे. अलीकडच्या काळात शाडू मातीच्या गणपतीची मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून या मूर्तीबाबत प्रशासनाकडून जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आता या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती घराघरांत पाहायला मिळतात. ही परंपरा जपली आहे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील मूर्तीकार ओंकार देवरुखकर यांनी.
ओंकार यांना आजोबा आणि वडिलांकडून गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा मूर्तीकार ओंकार देवरुखकर यांनी कायम ठेवली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच त्यांना मदत करते. या मूर्ती हातानेच बनवल्या जात असल्याने त्या घरच्या घरी कुटुंबातील सदस्यांकडून बनवल्या जातात. खरेतर पीओपीपेक्षा शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी सर्वाधिक मेहनत लागते.
- हवा तसा आकार
निखिल देवरुखकर सांगतात, शाडू मातीच्या गणेश मूर्तीला हवा तो आकार आपण देऊ शकतो. कारण ती माती वाळवणे सोपे असते. असे असले तरी संपूर्ण काम हे हातावरच असल्याने त्याला भरपूर वेळही लागतो. छोट्या आकाराची एक गणेश मूर्ती तयार होण्यासाठी साधारण पाच ते सहा दिवस लागतात, तर मंडळाच्या तीन फुटांपर्यंतच्या मूर्ती बनवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. मोठ्या मूर्तीना उभे करणेच एक आव्हान असते.
- पीओपीपेक्षा लागतो जास्त वेळ
ओंकार देवरुखकर सांगतात की, पीओपीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती तयार होण्यासाठी वेळ लागतो. कारण पीओपी हे लवकर हार्ड होणारे मटेरियल आहे. तर शाडू माती ही लवचिक असते. मात्र त्याचा फायदा असा असतो की पीओपीच्या मूर्ती साच्यात बनवल्या जातात. तर शाडू मातीच्या मूर्ती हाताने तयार केल्या जाणार असल्याने त्यांना हवा तो आकार देता येतो.
- गुजरात, मुंबईहून उपलब्ध होते शाडू माती
अमोल देवरुखकर सांगतात की, गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारी ही माती वेगवेगळ्या ठिकाणाहून आणली जाते. कधी गुजरात तर कधी मुंबईहून ही माती उपलब्ध होत असते. शिवाय मूर्ती तयार झाल्यावर रंग देताना स्प्रे पेंटिंगचा १० ते २० टक्के वापर केला जातो. मात्र ८० टक्के रंगकाम हे हातानेच केले जाते. शिवाय मूर्तीचे डोळे, गंध अशा प्रकारचे अलंकारही हातानेच काढले जातात.
- ग्राहकांच्या मागणीनुसार दिले जाते स्वरूप
ओंकार देवरुखकर यांच्या आई आश्वीनी देवरुखकर सांगतात की, ग्राहकांच्या मागणीनुसार गणेशमूर्ती तयार केली जाते. मग त्यात बालगणेश, बाळकृष्ण, बासरी वाजवणारा बाप्पा असे विविध स्वरूप बाप्पाला दिले जातात. शिवाय जवळपास दोन ते तीन महिन्याआधीच ग्राहकांनी आपला बाप्पा बुक केलेला असतो. किंवा काही ग्राहक तर अगदी वर्षभरापूर्वीच बुकींग करून ठेवतात.








