शहरासह जिल्ह्यात 27 रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सुमारे साडेतीन लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करत पर्यावरण संवर्धन चळवळीला बळ दिले.
शहरासह जिल्ह्यात 27 रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. यावेळी बाप्पांनी तब्बल सात दिवस मुक्काम ठोकला. सात दिवसांच्या भक्तीमय सेवेनंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाने गणेशमूर्तीचे तलाव, विहीर, नदी अशा जलस्त्रोतांमध्ये विसर्जन न करता प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात उभारलेल्या कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.
प्रशासनाच्या या आवाहनाला जिल्हाभरातील प्रतिसाद दिला. गणेशभक्तांनी जिल्ह्यात सकाळी दहा वाजल्यापासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. ग्रामीणसह शहरीभागात प्रशासनाने उभारलेल्या कृत्रिम कुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्त येत होते. गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा अखंड गजर करत चिमुकल्यांपासून अबाल वृद्धांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
सायंकाळी पाच वाजल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे पाणवठ्याच्या ठिकाणी सायंकाळी गणेशभक्तांची गर्दी दिसून आली. याठिकाणी प्रशासनाने उभारलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये गणशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले.
६३२ टन निर्माल्य संकलित जिल्ह्यात घरगुती गणेश विसर्जन दरम्यान सुमारे ६३२ टन निर्माल्य संकलित झाले. यामध्ये जिल्हापरिषदेकडे सुमारे ४९२ टन तर कोल्हापूर महापालिकेकडे सुमारे १४० टन निर्माल्य संकलित झाले.
१६० ठिकाणी विसर्जन कुंड
पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली होती. याठिकाणांवर संकलित झालेल्या गणेशमूर्ती ट्रक, टेंम्पो, ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने इराणी खण येथे आणत रात्री उशिरापर्यंत महापालिकेकडून येथे विसर्जन सुरु होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी अशी राबली यंत्रणा
गणेशमूर्ती संकलनासाठी २०५ टेम्पो ४८० हमाल, ७ जे.सी.बी., ७ डंपर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टैंकर, २ बुम, ५ रुग्णवाहिका, ५ साधे तराफे व १० फ्लोटिंगचे तराफे, १ क्रेन अशी यंत्रणा घरगुती गणेश विसर्जनासाठी मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत राबली.








