6 एप्रिलपर्यंत सलग आठवडाभर विविध कार्यक्रम
बेळगाव : श्री गणपती भक्तमंडळ, कारभार गल्ली, वडगाव-बेळगाव यांच्यावतीने वडगाव पिंपळकट्टा येथील श्री गणपती मंदिर आणि मारुती मंदिर येथे श्री गणेशाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दि. 30 मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवार दि. 6 एप्रिलपर्यंत सलग एक आठवडा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 30 मार्च रोजी सकाळी गुढी पूजन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा, सोमवार दि. 31 मार्च रोजी गुढी वाघनख्याचे पूजन, मंगळवार दि. 1 एप्रिल रोजी महिलांसाठी हळदी-कुंकू, बुधवार दि. 2 रोजी भव्य भजनसंध्या व रामजन्मोत्सव, गुरुवार दि. 3 रोजी सत्संग प्रवचन व महाप्रसाद, शुक्रवार दि. 4 रोजी दिंडी व भव्य शोभायात्रा, शनिवार दि. 5 रोजी विश्रांती आणि रविवार दि. 6 रोजी गंगाजळी व सत्यनारायण पूजा, सायंकाळी महाप्रसाद अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी भक्तांसाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने गणेशदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणपती भक्तमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.









