प्रतिनिधी/ चिकोडी
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत चिकोडी तालुक्यातून आमदार गणेश हुक्केरी हे बिनविरोध निवडून आले आहेत. या पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज त्यांनीच दाखल केल्याने निवडणूक अनावश्यक झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 4 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 11 ऑक्टोबरपर्यंत होती. या कालावधीत चिकोडी तालुक्यातून कोणत्याही इतर इच्छुकांनी अर्ज न भरल्याने आमदार हुक्केरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
ग्रामविकासाच्या दृष्टीने सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना, हुक्केरी कुटुंबाने सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने योगदान दिले आहे. चिकोडी तालुक्यातील 92 प्राथमिक कृषी पतसंस्थांना इमारती आणि गोदाम उभारणीसाठी एकूण रु. 17.56 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या साहाय्याने अनेक संस्थांनी स्वत:ची कार्यालये आणि साठवणूक सुविधा उभारून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भरता साधली आहे. सहकार चळवळीला बळकटी देणारे हे पाऊल ठरले असून हुक्केरी कुटुंबाच्या कामाची दखल संपूर्ण जिह्यात घेतली जात आहे.
जनतेच्या विश्वासाची पावती
गणेश हुक्केरी यांच्या बिनविरोध निवडीकडे केवळ राजकीय विजय म्हणून न पाहता, ही निवड जनतेच्या निष्ठेची, सहकार्याची आणि ऋणनिर्देशाची पावती असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. गेली चार दशके वडील प्रकाश हुक्केरी आणि आता गणेश हुक्केरी यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
माझे वडील प्रकाश हुक्केरी आणि जिह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढलो. तालुक्यातील सर्व पी.के.पी.एस. संस्थांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी मन:पूर्वक आभार मानतो. यापूर्वीप्रमाणेच आम्ही भविष्यातही सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहोत, असे आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितले.
गेल्या 40 वर्षांपासून मी व आमदार गणेश हुक्केरी शिक्षण, सहकार, राजकारण आणि धार्मिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करत आहोत. तालुक्यातील संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोट्यावधींचा निधी दिला आहे. या कार्याबद्दल मिळालेला सन्मान आमच्यासाठी अधिक जबाबदारीचं प्रतीक आहे. येणाऱ्या काळातही चिकोडी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय राहील, असे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.









