मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विश्वास : सत्ताधाऱ्यांकडे 33 आमदारांचे संख्याबळ
पणजी : राज्य विधानसभेच्या रिक्त असलेल्या सभापतीपदासाठी निवडूक प्रक्रिया प्रारंभ झाल्यानंतर मंगळवारी भाजप आणि मित्रपक्षांतर्फे आमदार गणेश गावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर यांच्यासह अन्य आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. गावकर यांनी विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे अर्ज सादर केला. सभापती पदासाठी उद्या दि. 25 रोजी निवडणूक होणार असून विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्षांतर्फे आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.
गावकर यांचा विजय होणार : मुख्यमंत्री
आमदार गावकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना, भाजपसोबतच मगोसह तीन अपक्ष आमदार, असे एकूण 33 जणांचे संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे गावकर यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्षांकडूनही अर्ज दाखल करण्यात आला असून त्यांना त्यांचे काम करू द्या, असे सांगितले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गावकर यांच्या अर्जाला अनुमोदन दिले असून त्यासंबंधी प्रतिक्रिया देताना, विधानसभेतील संख्याबळ पाहता आमचाच उमेदवार विजयी होईल, याबद्दल ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावकर यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गावकर यांनी प्रतिक्रिया देताना या पदासाठी सर्वांनी आपणास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन
सभापती निवडीसाठी उद्या गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी विशेष विधानसभा अधिवेशन आयोजित करण्यात आले असून ते सकाळी 11.30 वा. सुरू होणार आहे. तत्कालीन सभापती रमेश तवडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिकामी झाले असून त्या पदासाठी निवडणूक घेण्याकरिता हे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातर्फे अल्टॉन डिकॉस्ता यांनी अर्ज भरला असून सत्ताधारी पक्षातर्फे आमदार गणेश गावकर यांनी अर्ज सादर केला आहे. दोन उमेदवार असल्याने निवडणूक घेणे आता अटळ असून बिनविरोध निवड करण्याचे प्रयत्न सफल झाले नाहीत. सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ पाहता गावकर यांची निवड निश्चित आहे.









