नंदगड बाजारपेठेतील रस्ते गजबजले : पावसाच्या संततधारेमध्येसुद्धा खरेदीसाठी गर्दी
वार्ताहर/हलशी
गणेशोत्सवानिमित्त नंदगड बाजारपेठ मंगळवारी ग्राहकांच्या गर्दीने फुलली. बाजारात दिवसभर खरेदीची लगबग सुरू होती. गणेशोत्सव साहित्य विक्री दुकानात मोठी उलाढाल झाली. बाप्पांचे आगमन बुधवार दि. 27 रोजी करण्यात येणार असल्याने नंदगडमधील रस्तेही दिवसभर गजबजले होते. ग्रामीण भागातील नागरिकांनी खरेदीसाठी उपस्थिती दर्शवली. गणेशभक्तांनी दिवसभर विविध साहित्याची खरेदी केली. गणरायाच्या आगमनाचे वेध लागल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी झाली. मंगळवारी लोकांनी गणेशोत्सव खरेदीचा मुहूर्त साधला. घरगुती गणेशाची आरास आकर्षक होण्यासाठी व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग होती.
गणरायासाठी कापडी मखर, बल्ब, विद्युतमाळा, कुटुंबीयांसाठी कपडे आदींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत होती. उत्सवानिमित्त दुकाने विविध साहित्याने सजली आहेत. नंदगड बाजारपेठेत मांडलेले साहित्याचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. सायंकाळीही रस्ते गर्दीने गजबजले होते. बाजारपेठेत मखर सजावट साहित्य, पूजा साहित्य, फळे, फुलांच्या माळा, तोरण, विद्युत माळा, थर्माकॉल आणि फटाक्यांच्या दुकानांसमोर गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील ग्राहकांची गृहोपयोगी साहित्य खरेदीलाही पसंती होती. विविध फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत होती.
नंदगडमध्ये ‘हुंदरी‘ निमित्ताने बकरी खरेदीसाठी गर्दी

बुधवारी गणेशाचे आगमन होणार असून गुरुवारी व शुक्रवारी तालुक्यातील पारंपरिक हुंदरी‘ सणाला मोठे महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 26 रोजी नंदगडमध्ये बकरी बाजार भरविण्यात आला होता. बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली. कोट्यावधी रुपयांची खरेदी-विक्री या बाजारातून झाली असून, हजारो नागरिकांनी बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या बकरी खरेदीसाठी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली.









