बेळगाव : श्रीमाता, भक्ती महिला, राजमाता आणि समर्थ सोसायटी व ज्ञानमंदिर इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिव्हल अंतर्गत विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. मंगळवारी न्यू गुडस्शेड रोड येथील सोसायटीच्या सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रारंभी डॉ. मीना पाटील यांच्या हस्ते गणेश मूर्ती पूजन झाले. त्यानंतर प्रतिभा नेगीनहाळ, रुपाली जनाज, वंदना चव्हाण, अलका जाधव, अनुराधा देसाई आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. महिलांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन प्रोत्साहन दिले जात आहे.
मंगळवारी झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पतीचा फोटो, 10 रुपयांचे कॉईन, कुटुंबाचा एकत्रित फोटो असणाऱ्या महिलांचा गौरव केला. त्याबरोबर महिलांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळ घेण्यात आले. सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विनायक बांदेकर यांनी केले. महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एक दिवस मनोरंजन व्हावे. यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महिला उर्त्स्फूतपणे सहभागी झाल्या.बुधवार दि. 21 रोजी दु. 3 वा. महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मुगाचे गोड पदार्थ व मुगाचे तिखट पदार्थ अशा दोन प्रकारच्या स्पर्धा आहेत. तर गुरुवार दि. 22 रोजी सायंकाळी 4 वा. ‘जागर लोकसंस्कृतीचा’ हा कार्यक्रम होणार आहे.









