पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा, अनेक मान्यवरांचाही शुभसंदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात गणेशचतुर्थीचा उत्सव अमाप उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आनंदोत्सवासाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. इतरही विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी या सणाच्या निमित्ताने त्यांचे शुभसंदेश दिले आहेत. मुंबई, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली आणि इतर महानगरांमध्येही 10 दिवसांच्या या उत्सवाचा उत्साह पहावयास मिळत आहे. सहस्रावधी सार्वजनिक गणेशमंडळांनीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना केली आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत सार्वजनिक गणतींची पूजाआर्चा चाललेली होती.
भारताप्रमाणे अन्य देशांमध्येही तेथील भारतीयांनी गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर इत्यादी देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. भारताप्रमाणे अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांमध्ये प्राचीन गणेशमंदिरे आहेत. यांपैकी कित्येक देशांमध्ये आजही गणेश या देवतेचे महत्व मानले जाते आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
घरोघरी गणपती
महाराष्ट्रात शनिवारी लक्षावधी घरांमध्ये श्रीगजाननाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दीड दिवसांपासून 11 दिवसांपर्यंत किंवा काही स्थानी यापेक्षाही अधिक दिवस आता गणरायाचे वास्तव्य या घरांमध्ये असेल. विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी त्यांच्या घरात साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाचे व्हिडीओ चित्रण प्रसारित केले आहे. राजकीय नेत्यांनीही गणरायाकडे सर्वांच्या क्षेमकुशलासाठी प्रार्थना केल्या आहेत. गणेशोत्सव हा आता साऱ्या देशाला जोडणारा एक सेतू बनला आहे.
सकाळपासूनच प्रारंभ
घरोघरी शनिवारी सकाळपासूनच श्रीगणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी लोकांची लगबग चाललेली दिसून आली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तरेतील राज्यांमध्येही घरोघरी गणपती आणण्याची प्रथा कमी अधिक प्रमाणात आहे. अनेक घरांमध्ये सकाळी लवकरच विधिवत् श्रीगजानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शनिवारी दिवसभर संपूर्ण देश श्रीगणेशोत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाल्याचे पहावयास मिळाले. पुढचे काही दिवस हेच वातावरण प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार अनुभवास येणार आहे.









