चांद्रयान-3 च्या थीमवर सजले मंडप, हैदराबादमध्ये 63 फूट उंचीची इको-फ्रेंडली मूर्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या देशभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून लाडक्या गणेशाच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली दिसून येत आहे. गेल्या चार-आठ दिवसांपासून गणेश चतुर्थीची जय्यत तयारी सुरू आहे. आता मंगळवार, 19 सप्टेंबर हा उत्सवाचा पहिला दिवस असून गणराय विराजमान होणार आहेत. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळीवर अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव रंगणार आहे.
देशभरात गणेश चतुर्थीची तयारी अंतिम टप्प्यात असून ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. मुंबई, कोलकाता, जयपूर, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मंदिरे आणि मंडप सजवण्याचे काम जोरात सुरू आहे. हिंदू पॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी तिथीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवसांत भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. गुऊवार 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी, घरगुती गणपतींचे सोयीनुसार दोन, पाच, सात, नऊ दिवसांनी विसर्जनही केले जाणार आहे. गणपतीच्या नैवेद्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये मोदक आणि लाडूंची मागणी वाढली आहे. फळे, फुलांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्वच वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लोकांची गर्दी होत आहे.
दरवषीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह अन्यत्र गणपती पूजेची विशेष तयारी सुरू आहे. मूर्तीकारांनी भाविकांच्या आवडीनुसार विविध प्रकारच्या गणपती मूर्ती बनवल्या आहेत. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये चांद्रयान-3 मॉडेलच्या थीमवर गणेश पूजा मंडप बांधण्यात आला आहे. तर, हैदराबादमध्ये एका सार्वजनिक उत्सव मंडळाने 63 फूट उंचीची इको-फ्रेंडली मूर्ती तयार करत सर्वांचे आकर्षण वाढवले आहे. या मूर्तीवर शेषनागही कोरण्यात आला आहे.
मुंबईमधील विविध मंडळांनी गेल्या आठवड्यापासूनच मूर्ती मंडपांमध्ये आणून ठेवल्या असून मंगळवारी सकाळी त्यांची रितसर पूजाअर्चा केली जाणार आहे. आकर्षक मूर्ती, डोळ्यांचे पारणे फेडणारे डेकोरेशन आणि विद्युत रोषणाई यामुळे मुंबईमध्ये गणेशभक्तांचा उत्साह काही औरच असतो. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा गणराय अशी ख्याती असलेल्या गणेशांच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये पहिल्या दिवसापासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येणार आहेत.