बिहार निवडणुकीनंतर राज्य दौऱ्यावर : मुख्यमंत्री बदलावर चर्चा शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमध्ये अधिकार हस्तांतर आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, बिहार निवडणुकीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वरिष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी राज्य दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांचा दौरा ‘नोव्हेंबर क्रांती’ला कारणीभूत ठरेल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 19 किंवा 20 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी राज्य दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राज्य काँग्रेसमधील काही नेत्यांनी मुख्यमंत्री बदलाविषयी उघडपणे वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे राज्य काँग्रेस सरकारमध्ये नोव्हेंबरमध्ये मोठे बदल होतील, अशी चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार असल्याचे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तावाटपाचा फॉर्म्युला लागू केला जाईल, अशी शक्यता असतानाच राहुल गांधींच्या राज्य दौऱ्यामुळे कुतूहलात भर पडली आहे.
सत्ताधारी राज्य काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण तीव्र झाले आहे. सिद्धरामय्या यांचे समर्थक राज्यात मुख्यमंत्री बदल किंवा सत्ता हस्तांतरण नाहीच, अशी प्रतिक्रिया देत आहेत. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील नेते सत्ता वाटपाचा फॉर्म्युला लागू होणार असल्याचा दावा करत आहेत. चढाओढीचे राजकारण सुरू असतानाच बेळगाव जिल्हा दौऱ्यावेळी सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांनी सिद्धरामय्या यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याची क्षमता मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे आहे. तेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे खळबळ माजली. यतींद यांच्या वक्तव्याविषयी काँग्रेसमध्ये संमिश्र मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यात नेतृत्त्व बदल होईल की मंत्रिमंडळ पुनर्रचना, हे बिहार निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
नशिब कोणीही टाळू शकत नाही : एस. एस. मल्लिकार्जुन
नोव्हेंबरमधील क्रांतीविषयी मला माहिती नाही. पुढील मुख्यमंत्री कोण असेल हे ठाऊक नाही. सर्वकाही ज्याचे त्याचे नशिब. कोणाच्या नशिबी काय आहे, ते कोणीही टाळू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी दिली आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत मला काहीही माहीत नाही. शेवटी हायकमांड निर्णय घेईल. हायकमांडच्या आदेशानुसार सर्वकाही होईल. कोणीही मुख्यमंत्री बनू शकतो, असेही ते म्हणाले.
नोव्हेंबरमध्ये बदलाची क्रांती : कुणिगल रंगनाथ
नोव्हेंबरमध्ये बदलाची क्रांती होईल. डिसेंबरमध्ये बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यावर आम्ही चर्चा करू, असे वक्तव्य कुणिगलचे काँग्रेस आमदार एच. डी. रंगनाथ यांनी केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्याच्या राजकारणाबाबत हायकमांडने घेतलेला निर्णय सर्वांना ठाऊक आहे. आगामी काळात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. अनावश्यक गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
‘त्या’ वक्तव्याविषयी केपीसीसीकडून हायकमांडला अहवाल
राज्य काँग्रेस सरकारमधील उत्तराधिकाराच्या मुद्द्यावर उघडपणे वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. यतिंद्र यांच्या विधानामुळे खळबळ माजताच कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने हायकमांडला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे यतिंद्र यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी यतिंद्र यांना अंकूश लावण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही अप्रत्यक्षपणे संदेश देताना कुणासमोर काय बोलायचे आहे, ते बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.









