राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यांवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांची टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशात भारताची बदनामी करणे, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आवडता छंद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंग यांनी केली आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर केलेला टीकात्मक टिप्पणीवर सिंग सोमवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी मनात देशभक्तीची भावना असावी लागते. एका देशद्रोह्याकडे अशी भावना कोठून असणार ? राहुल गांधी यांना हे समजण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. भारताची विदेशी भूमीवर अवमानना करणे हेच ज्याचे ध्येय आहे, अशी व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेऊच शकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी गांधींवर शरसंधान केले आहे.
राहुल गांधींचे विधान
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमान संघ आणि भारतीय जनता पक्षासंबंधी वादग्रस्त विधाने केली आहेत. टेक्सास येथील भारतीय वंशाच्या समुदायासमोर बोलताना त्यांनी ही विधाने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिला विरोधी असून महिलांनी केवळ घरात राहून चूल आणि मूल एवढेच करावे, अशी संघाची विचारधारा आहे. याउलट काँग्रेसची भूमिका महिलांनी भव्य स्वप्ने पहावीत आणि सर्व क्षेत्रांमध्ये देशाचे नेतृत्व करावे, अशी आहे. भारतासंबंधीची संघाची विचारसरणी एकसुरी आहे, तर काँग्रेसची बहुआयामी आहे, अशी मांडणी गांधींनी या कार्यक्रमात केली होती.
घटनेचा विषय
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतातील लक्षावधी लोकांच्या हे लक्षात आले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे पुष्कळसे मतदार भारतीय जनता पक्षापासून दूर झाले आहेत, असेही वक्तव्य गांधी यांनी केले. शिवाची अभयमुद्रा ही भारतातील सर्व धर्मांमध्ये कशी आहे, हे मी माझ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने केलेल्या पहिल्या भाषणात स्पष्ट केले होते, असेही त्यांनी उपस्थित समुदासमोर प्रतिपादन केले.
अन्य नेत्यांचीही टीका
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर भारतीय जनता पक्षाच्या अन्य नेत्यांनीही टीकाप्रहार केले आहेत. राहुल गांधी यांच्या पक्षाचा सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र, ते विदेशात लोकांना तत्वज्ञान सांगत फिरत आहेत. ते अद्याप लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी भारताची अवमानना चालविलेली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.









