उचगाव,प्रतिनिधी
वाढत्या मारामाऱ्या व चोऱ्या पाठोपाठ आता गांधीनगर परिसरात गोवा बनावटीची दारू,तीन पानी जुगार क्लब,गुटखा,गावठी दारू,गांजा,ओपन बार अशा अवैध धंद्याचे मोठे आव्हान गांधीनगर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अवैध धंद्याचा येथे वाढता आलेख आहे.मात्र नवीन डी.बी.ब्रँचमध्ये आपल्याकडे ‘कलेक्शन ‘कसे राहील याकडे अनेकांचे लक्ष अधिक दिसून येत असून, यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत उचगाव, सरनोबतवाडी, वसगडे, चिंचवाड, गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी या सात गावांचा समावेश आहे.दोन नंबर वाल्यांच्या फेऱ्या पोलीस ठाण्याच्या आवारात वाढल्या आहेत. महिलेवर अन्याय झाला म्हणून थेट पोलिस ठाण्यावर भर पावसात नागरिकांनी मोर्चा काढण्याची घटना नुकतीच घडली आहे.गोवा बनावटी दारुचे मोठे केंद्र गांधीनगर परिसर बनला आहे.गावठी दारू गांजाचे प्रस्थ वाढले असून, गावागावातून तरुणाई गांजांच्या विळख्यात सापडलेली आहे. व्हिडिओ गेममध्ये पैसे हरल्यानंतर दररोज तंटे वाढले असून, अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.येथील तरुणाई कर्जाच्या खाईत लुटून बऱ्याच जणांचे जीवन बरबाद झाले आहे. तरीही पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. चोरीछुपे ‘विकी’चे बेटिंग चालू आहे.दोन नंबर वाल्यांची मांदियाळी पोलीस ठाण्याच्या आवारात रोज संध्याकाळी असते.त्यामुळे गांधीनगर पोलीस करतात तरी काय असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी उचगाव फाट्यावर तरुणांनी दोनशे रुपयांच्या उधारीवरून एकाचा क्रूरपणे खून केला.या घटनेचा दहशतीसाठी वापर करण्यासाठी या तरुणांनी खूनाचा व्हिडिओ बनवला.व्यसनाधिनता तरुणांच्या मध्ये वाढली आहे.उचगाव फाटा यापूर्वी अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू बनलेला आहे.ओपन बार,दारू,छोट्या मोठ्या मारामाऱ्या,गुंडगिरी,महिलांची छेडछाड येथे नित्याची बनली आहे. याआधीही फाट्यावर वसुलीवरून एकाचा खून झाला होता. पोलिसांचे होणारे दुर्लक्ष गुन्हेगारीला आणखीनच बळ देणारे आहे.वेश्याव्यवसाय करणारे एजंट सक्रिय झाले असून ‘सुदर्शन ‘दाखवून लाखोंची माया लुटण्यार्या एजंटांना खुलेआम नंदनवन आहे.येथील अनेक लॉजवर बेकायदेशीर एकांत, एसी हायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.दारुवरुन बिअर शॉपी, परमिट रूम येथे मारामारीच्या घटना वाढल्या आहेत.
प्रत्येक गुटखा ठेवणाऱ्या टपरीधारकांकडून काही पोलीस,बोगस सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून ‘हप्ते ‘वसूल करतात अशी चर्चा आहे.गावठी दारुचा तर पूर आला आहे. नूतन सपोनि अर्जुन घोडे पाटील यांनी हजर होताच हद्दीची माहिती फिरुन घेतली आहे. गडमुडशिंगी येथे सापडलेल्या सोन्याचा तपास केला आहे.मात्र अवैध धंद्याचे सध्याचे वाढलेले प्रमाण याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.शहरालगत असलेल्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोठ्या गावातून अवैध धंदे हद्दपार करण्याची गरज असून गुन्हेगारीचा हा वाढता आलेख पोलीस कमी करतील का असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.









