पारंपरिक बेटींग सोबतच बुकींचा नवा फंडा
नवीन ऍप्लीकेशन, आयडी, अंगडीया रॅकेटचा वापर
कोल्हापूर /आशिष आडिवरेकर
अवघा देश टी 20 वर्ल्डकप बघण्यात गुंग असतानाच एक यंत्रणा मात्र यातून पैसे कमवण्याच्या तयारीत आहे. पारंपरिक बेटिंगसोबतच सट्टेबाजही सध्या हायटेक बनली असून त्यांनी ऑनलाईन सटय़ाचा नवा फंडा बाजारात आणला आहे. सध्या जिह्यात गांधीनगर, गुजरी आणि शाहूपुरीतून बेटिंगची सुत्रे मोठय़ा प्रमाणात हलवली जात आहेत. प्रकाश (बेला) व त्याचा भाउ शाहरुख, शिवन, छोटा सागर हे गांधीनगरमधून तर संतोष, एन. ओ. हे गुजरीतून तर स्वतःला बेटिंगचा डॉन समजणारा जी. के शाहूपुरीतून बेटिंगची सुत्रे हलवत आहे.
क्रिकेटमध्ये करोडो रुपयांचा सट्टाबाजार चालतो हे तर उघड सत्य आहे. करोडो लोक जीव मुठीत धरून मॅच बघत असतात मात्र काही लोक सट्टेबाजारी करुन क्रिकेटच्या नावाखाली अब्जावधी रुपयांची माया गोळा करतात. सध्या आयपीएल सुरु असल्याने सट्टा बाजारात लाखो रुपयांची रोज उलाढाल होते आहे. सट्टाबाजारात क्षणाक्षणाला चित्र बदलते, भाव बदलतात. मॅचच्या पहिल्या बॉलपासून ते खेळ संपेपर्यंत भाव कमी जास्त होतात. त्यात अनेक लोक हजारो रुपये कमावत आणि गमावत आहेत. सट्टयाच्या दुनियेत सट्टा लावणाऱया व्यक्तीला लाईन म्हटले जाते. ही सट्टा लावणारी व्यक्ती एजंट किंवा ज्याला पंटर म्हटले जाते, त्याच्यामार्फत बुकीशी संपर्क साधते. या बाजारात बुकीला डिब्बा असे म्हटले जाते. सट्टा बाजार हा पूर्णपणे विश्वासावर चालतो. बुकी व सट्टा खेळणारा हे कधीही समोरासमोर येत नाहीत. त्यांचा संपर्क मोबाईलवरुन होत असतो. काही ग्राहक थेट ऍडव्हान्स रक्कम जमा करतात काही मध्यस्थीच्या ओळखीने बेटिंग खेळतात. पैश्यांचा व्यवहार मॅचनंतर केला जातो. हा व्यवहार अंगडीयामार्फत केला जातो.
डीएम, एनओ, शिवन, बेला
बेटिंग घेणाऱयांनी आपआपल्या एरिया वाटून घेतल्या आहेत. गांधीनगर येथील प्रकाश (बेला), शिवन, छोटा सागर, यांच्यासोबत गुजरीतील संतोष, एन. ओ., कागलमधून अमित, तर मंगळवार पेठेतून संतोष ही बेटिंगमधील बडी प्रस्थ आहेत. सध्या बेटींग दुनियेत सौरभ ने प्रवेश केला असून, त्याने आपला विकास करण्यासाठी बार सोबतच ‘आण्णाच्या मदतीने बेटिंगमध्येही पाय रोवले आहेत. याचसोबत दिपक नामक एक तरुण आपले नशीब नव्याने आजमावत आहे.
200 हून अधिक पंटर
बेटिंग गोळा करणारे सुमारे 200 हून अधिक पंटर कोल्हापुरात विविध ठिकाणी सक्रिय आहेत. यातील प्रत्येकजण वरील प्रत्येकासाठी बेटिंग खेळणाऱयांना गोळा करतो. त्याला 10 टक्के कमिशन दिले जाते. तसेच प्रत्येक ग्राहकाकडून वसुलीची जबाबदारी त्यालाच घ्यावी लागते.
सेशनवर चालते बेटिंग
सध्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठय़ा प्रमाणात सेशनवर बेटिंग चालते. क्रिकेटमधील 20 ओव्हर्सना मोठा खेळ किंवा लंबी पारी म्हटले जाते. तसेच दहा ओव्हर्सना सेशन व सहा ओव्हर्स पर्यंत सट्टा लावायचा असल्यास छोटी पारी म्हटले जाते. प्रत्येक मॅचच्या सेशनवर बेटिंग लावण्याचा नवा ट्रेंड सध्या रुजु लागला आहे. 20 ओव्हरच्या सामन्यात पहिल्या 5 षटकांत किती धावा होतील, पुढील 5 षटकांत किती धावा आणि एकूण किती स्कोर होईल यावर अंदाज वर्तवून बेटिंग लावले जाते. प्रत्येक सेशनवर केवळ फोनवरुन कोटय़वधी रुपयांचे बेटिंग लावले जाते. हलक्या टिमच्या मॅचला सेशनवर जोरात बेटिंग चालते.
जी. के., शाहरुख ऍप्लीकेशन आयडीमध्ये तेजीत
मुख्य बेटींग चालकाकडून एक वेबसाईट किंवा ऍप्लीकेशन तयार केले जाते. जे बेटिंग खेळणार आहेत, त्यांना सामन्याच्यापूर्वी काही वेळ एक युजर आयडी आणि पासवर्ड मोबाईलवर मॅसेज केला जातो. त्या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर सट्टा खेळला जाऊ शकतो. या हायटेक यंत्रणेने पोलीस यंत्रणेसमोर आवाहन उभे केले आहे. सध्या ऍप्लीकेशन बनविण्यामध्ये शाहूपुरीतील जी. के. गांधीनगरमधील शाहरुख हे तेजीत आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईनचे सर्वात जास्त आयडी आहेत. याच जोरावर जी. के सध्या बेटिंगमधील डॉन बनला आहे.
पोलीस कारवाई शुन्य
गेल्या दोन महिन्यात आशिया चषक सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कपदरम्यान बेटिंग जोरात सुरु आहे. मात्र याची पुसटशी कल्पना पोलिसांना नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात बेटिंगची एकही कारवाई झालेली नाही. किंवा पोलीस याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. सध्या बुकी बेटींगसाठी हॉटेल, फार्म हाउसचा आधार घेत आहेत.