संतोष माने / उचगाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध गांधीनगर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असून ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी गांधीनगर पोलीस झटत आहेत.तर उचगाव हायवे चौकातील ब्रिज खाली व तनवाणी कॉर्नर येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे ब्रिज खाली मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातूनच वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना ,ग्रामस्थांना व वाहनधारकांना जीवावर उदार होऊन कसरत करावी लागत आहे. पण या अडचणीतूनही पावसात भिजत तर कोणी हात फ्रॅक्चर झाला असतानाही वाहनधारकांना प्रवाशांना मदतीचा हात देत असल्याने नागरिकांच्यातून गांधीनगर पोलिसांच्या बद्दल कौतुकाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वाहतूक पोलीस कर्मचारी राजू नाईक हे गाडीवरून जात असताना पडले. त्यांनी सेवा रुग्णालय येथे डिजिटल एक्स-रे काढल्यानंतर त्यांचा हात फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यानंतर आपल्या हाताला प्लास्टर घालून रजेवर न जाता तात्काळ आपली वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर रुजू झाले.
गांधीनगर पोलिसांची सध्या संख्या कमी असतानाही उचगाव हायवे चौकात तीस ते पस्तीस वाहने खड्ड्यातून बाहेर काढत सुरक्षितपणे वाहनधारकांना मार्गस्थ केले. गांधीनगरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले हे दररोज स्वतः उन्हात व पावसात रस्त्यावर उभारून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरी न होण्यासाठी दिवस रात्र उभे आहेत. उचगाव चौकातील मोठे खड्डे सार्वजनिक बांधकाम खाते व उचगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ.मालूताई काळे यांना विनंती करून मुरूम टाकून मुजवून घेतले. यामुळे होणारे छोटे-मोठे अपघात टळले. वसगडे यात्रा, मणेरमाळ येथे होणाऱ्या वारंवार चोऱ्या यासाठी रात्री गस्त तर सकाळी गांधीनगर येथे गर्दी ,वाहतूक कोंडी यातून ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी गांधीनगर पोलीस अतिशय चांगल्या प्रकारे झटत आहेत. गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, तसेच आकाश,मोहन,आयुब, विराज, बजरंग, अशोक,चेतन,सुदर्शनी मामा, संतोष, दिगंबर, सुनिल, राजू,महिला पोलिस कांबळे व सर्वच अधिकारी व पोलिसांचे सर्व थरातून नागरिकांतून कौतुक होत आहे.
सध्या परतीच्या पाऊसाने सर्वत्र धूमाकुळ घातला आहे परिणामी सर्वत्र रस्त्याची दुर्दशा झाली आहे सणासुदीचे दिवस असल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी व रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे खराब झालेले खड्डे त्यातून मार्ग काढत पुढे सरकणारी वाहने यामुळे कधी कधी वाहतूकीची कोंडी होते अशा वेळी वाहन धारकांना शिस्त लावून वाहतूकीची कोंडी फोडण्या साठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.पण गांधीनगर पोलीसांनी सर्वांना विश्वासात घेऊन यावेळी अतिशय चांगली सोय केली आहे. यामुळे पोलिसांची सकारात्मक प्रतिमा तयार झाली असून नागरिकांच्यातूनच गांधीनगर पोलिसांचा नाद खुळा कर्तव्यासाठी काय पण असे कौतुक जनतेतून होत आहे.
उचगाव राष्ट्रीय राजमार्ग पूला खाली वाहतूक कोंडी ही नित्याचीच होऊन बसली आहे प्रचंड पाऊस त्यात तुंबणारी गटर त्याचे रस्त्यावर आलेले पाणी पडलेले खड्डे त्यातून मार्ग काढणारी वाहन आणि त्यांना शिस्त लावणारी पोलीस तसेच उंचगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असे एकूण चित्र रोज पाहायला मिळते आज सकाळी ट्रॅफिक पोलीस राजू नाईक हे एका हाताला दुखापत झाली असताना सुद्धा एक हात गळ्यात अडकवून आपले कर्तव्य बजावत असल्याचे बोलके छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.