धन्य धन्य वसुमती
इचा महिमा सांगू किती? प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे …..
अंतरिक्षि राहती जीव ……..
तोही पृथ्वीचा स्वभाव …….
देह जड नसता जीव कैसे तगती……..
ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा, ब्रम्हादिकापासून आम्हा….. अशा या पाचही तत्वांना आपल्याबरोबर प्रकट करणारी पृथ्वी अनादी अनंत काळापासून आमच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. या पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा संकटं आली त्यावेळेला या पृथ्वीने गायीचे रूप घेऊन देवांकडे तक्रार मांडलेली दिसते. अशा या पृथ्वीला गायीचं रूप म्हणजेच कामधेनूचं रुप मानतात. तुम्ही ज्या ज्या गोष्टीची इच्छा कराल ती ती गोष्ट पृथ्वी तुम्हाला देत जाते. धनधान्य असो फळफुल असो किंवा धातू खनिज असो किंवा वायुरूपातील गोष्टी जल रूपातील गोष्टी या सर्व पंचमहाभूतांना आपल्यातून प्रकट करणारी पृथ्वी खरोखरच कामधेनू ठरते. तिच्यातील विविध रंगाची फुलं आणि त्याचे सुगंध तिचं गंधवती हे रूप सार्थ करतात. तिच्यातून निर्माण होणाऱ्या वृक्षवेलींवरची रसदार फळ तिला रसवती ठरवतात. ज्याला अमृताची चव असते तिच्या सृष्टीतील सगळा पसारा पाहिला की आपण थक्क होतो. एखादं निसर्गाचं सुंदर पेंटिंग पाहावं तशी आपली अवस्था होते म्हणून ती रुपवतीसुद्धा ठरते.
पृथ्वीला इंग्रजीमध्ये अर्थ म्हणतात. तिच्यातील धनसंपदा पाहिली तर हे नाव सार्थ वाटतं. तिच्या पोटातली खनिजं, रत्नसंपदा, धातू, जंगलं, शेत या सगळ्या गोष्टी माणसाला धन मिळवून देणाऱ्या असल्यामुळे ही पृथ्वी धनवंतीसुद्धा आहे. खरंतर पृथ्वीला पार्वती असेही म्हटले जाते. जड रुपातली पृथ्वी जरी शिवाने निर्माण केली असली तरी त्यात चैतन्यसृष्टी निर्माण करून पार्वतीने हे सगळं मायारूपी जग आपल्यासमोर उभं केलंय. म्हणूनच गगन सदृश्य असलेला विष्णू किंवा नीलवर्ण शंकर हे आकाशासारखे अलिप्तच राहतात आणि लक्ष्मीच्या रूपात पार्वतीच्या रूपात ही चैतन्य शक्ती या पृथ्वीवर ती वावरताना दिसते.
अशा या पृथ्वीवर पंचमहाभूतांच्या जड रूपाचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो, त्यांचं गुंफलेपण मनाला मोहवून टाकतं. पण आम्ही मात्र या वसुंधरेशी कसं वागतो हे पाहिलं की वाईट वाटतं. या भूमीवर, कुदळ घालतो, खणतो, ख•s करतो, जाळतो, ….पण ती मात्र क्षमाशील….आम्हाला वाटतं प्रत्येक गोष्ट मीच करतोय, अहंकार हा गुणदेखील पृथ्वीचाच…..जो आपल्या शरीराबरोबर निर्माण होतो अन् त्याच्या बरोबरीने संपतो. आम्हाला ब्रह्माची ओळख होतच नाही. कवी मंगेश पाडगावकर आपल्या एका काव्यात लिहितात…
जय जय हे पार्थिवते……….असते का स्मित अधरा विण, जल वर्षाविण, कळते आता ब्रह्म तुझ्यातून, बिजामधुनी वर येणाऱ्या वृक्षापरी तू सत्य म्हणून ब्रह्म सत्य, सौंदर्य सत्य, रंग, रूप, गंध, रस सत्य….. कारण ब्रह्म तुझ्या गर्भातच वाढतसे, विकसितसे ……..
जय जय हे पार्थिवते………








