उन्हाळा ऋतू पावसाचे वैभव प्रदान करत असला तरी सर्वांना जड जातो. कवयित्री इंदिराबाई संतांच्या शब्दात ‘पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळी कुठे राहिली गुंतून?’ कडक उन्हानंतर पहिल्या पावसाची वाट बघताना मन आतूर झाले नाही तरच नवल! भेगा पडून शुष्क झालेली माती पावसाची पहिली सर बरसली की ताजेपणाने बहरून येते आणि आपला आनंद उधळून देते तो मृद् गंधाच्या रूपाने. पाश्चात्य लोकांना वाटते की पहिल्या पावसात अशी काय जादू आहे की भारतीय मने त्यासाठी आसुसलेली असतात? कारण इथे पृथ्वी तापते त्या ताप-अनुभवाने गारव्याचा आनंद घेता येतो. मृद् गंध अनुभवाला येतो. पाश्चात्य देशात अगणित, डोळे दिपवणारी, रंगांची उधळण करणारी टपोरी फुले फुलतात परंतु त्यांना सुगंध नसतो. भारतात सुगंधी फुलांची उधळण पृथ्वी करते. कारण ती इथे सूर्य देवाची आराधना करते. चिमुकले जाईचे फूल, त्याचा सुगंध दूरदूरपर्यंत जातो. भगवान बुद्ध म्हणतात, माणसाच्या शरीरातले चैतन्य निघून गेले की त्याच्या देहाला दुर्गंधी सुटते, परंतु फुले झाडांपासून वेगळी झाली तरी दीर्घकाळ सुगंध देतात कारण ती कामनाविरहित असतात. माणसाचा देह पडला तरी वासना उरतातच.
श्रीसूक्तम् मध्ये म्हटले आहे की, ‘गंधद्वारा दूराधर्षा नित्यपुष्टाम करिषिणी, सर्व भूतानां ईश्वरी तां श्रियं अहं उपन्हये’. पृथ्वीला गंध आहे. पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, प्रत्येक ऋतूमध्ये पृथ्वीला निरनिराळा सुगंध असतो. भाद्रपद महिन्यात श्राद्धाच्या दिवसात पृथ्वीला वेगळा सुगंध असतो, कारण त्या दिवसात आपण ऋषींची आठवण करतो म्हणून पृथ्वीला ऋषींचा वास असतो. तो पवित्र असतो. तो वास घेता आला पाहिजे. जर कधी जंगलात गेलो तर वेगवेगळ्या वृक्षांचा मिश्र वास तिथे पसरलेला असतो. जमीन एकसारखीच असते. बीज वेगळे असते. कडुनिंबाचा कडू वास, तर चिकू, आंबा या वृक्षांचा वास गोड असतो. प्रत्येक वनस्पती ही गंधयुक्त असते. भाज्यांनाही वास असतो. हिरव्या पालेभाज्यांचा गंध नाकाला सुख देतो. हिरवीगार कोथिंबीर नुसती हातात धरली तरी तो गार सुवास हाताला चिकटतो. धान्याचे विविध प्रकार स्वत:ची ओळख करून देतात ती रंगरूपापेक्षाही गंधानेच. सुवासिक तांदळाच्या भाताने भूक प्रज्वलित होते. ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, मुगाची खिचडी वासाने स्वत:च्या अस्तित्वाची खूण मनात उमटवतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा गाभाऱ्यात श्रीरामांसमोर मानसपूजा करीत होते. साग्रसंगीत पूजा झाल्यानंतर महाराजांनी श्रीरामांना नैवेद्य दाखवला आणि गरम जिलेबीचा सुवास समूहसाधना करणाऱ्या भक्तांपर्यंत गेला. सगळ्यांना वाटले की आज प्रसादात आपल्याला जिलेबी मिळेल. आरती झाल्यानंतर भक्त जेवणाच्या पंक्तीत बसले, पण जेवणात जिलेबी नव्हती. भक्तांची निराशा झाली. भक्तांनी महाराजांना याबाबत विचारले तेव्हा महाराज श्रीरामांसमोर गेले आणि म्हणाले, मनाने तयार केलेल्या जिलेबीचा सुवास जर लौकिक अवस्थेत लोकांपर्यंत पोहचतो, तर मनाने तयार केलेल्या पदार्थाने श्रीरामा तुमचे पोट भरले की माझेही पोट भरलेच पाहिजे. थोर विद्वान स. कृ. देवधर म्हणतात की, ‘हा अद्वैताचा आचार आहे.’
सुगंध सुटणे आणि तो समुदायाला न जाणवता फक्त एखाद्या उच्च प्रतीच्या साधकाला जाणवणे ही अध्यात्मप्रचिती आहे. जिथे देवतांचा वास असतो तिथे सुगंध दरवळत असतो. सुगंधामध्ये शक्ती असते. देवपूजेमध्ये एक उपचार असा आहे की देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा सुवास घ्यायचा व ते बाजूला ठेवायचे. यामागील तत्त्वज्ञान असे आहे की ते फूल काही काळ परमेश्वराच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्याच्यात विशिष्ट शक्ती निर्माण होते व सुगंधाद्वारे ती आजूबाजूला पसरते. ती शक्ती लाभावी म्हणून देवावर वाहिलेल्या फुलाचा वास घेतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘तैसाचि नैसर्गिकु शुद्धु, मी पृथ्वीच्या ठायी गंधु, गगनी मी शब्दु, वेदी प्रणवु?’ परमात्मस्वरूपाचा जो सुगंध आहे तो शुद्ध स्वरूपात पृथ्वीमध्ये आहे. भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, पृथ्वीमध्ये मी पवित्र गंध आहे. ओशो रजनीश असे म्हणतात की श्रीकृष्णाने नुसते सुगंध न म्हणता पवित्र सुगंध का म्हटले? याचा अर्थ सुगंध हा अपवित्रही असू शकतो. सर्व सुगंध हा पवित्र नसतो. काही सुगंध असे असतात की त्यामुळे जीवनाची ऊर्जा खालच्या दिशेने प्रवाहित होते. ती कामवासना जागृत करते. कामवासनेच्या मार्गाकडे घेऊन जाणारा सुगंध अपवित्र असतो. ओशो पुढे म्हणतात, ‘खरा पवित्र सुगंध अजून कोणत्याही बाजारात आलेला नाही. तो विकत घेता येत नाही. ज्याचे हृदय संवेदनशील आहे तोच संतमहात्म्यांच्या शरीरातला सुगंध घेऊ शकेल. पृथ्वीमध्ये असलेला पवित्र सुगंध, अर्जुना, मी आहे.’
ज्ञानेश्वर माऊलींनी साधना करताना कोणत्या आसनावर बसावे हे ज्ञानेश्वरीत सविस्तर सांगितले आहे. प्राण्यांचे कातडे आसन म्हणून कशासाठी घ्यावे याचे विवेचन करताना पू. शिरीषदादा कवडे असे म्हणतात, ‘वाघ क्रूर, पण त्याच्या कातड्यावर बसून साधना करणारा साधक मात्र प्रेमळ वृत्तीचा होतो. हरीण चंचल मनाचे असते, पण मृगाजिनावर बसून साधना करणाऱ्या साधकाचे मन मात्र लवकर स्थिर होते कारण प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कातड्याचा गुण बदलतो. उलट होतो. तसेच वाघाच्या कातड्याला एक विशिष्ट उग्र वास असतो, दर्प असतो. रानावनातल्या पशुपक्ष्यांच्या गंधसंवेदना खूप तीव्र असतात. वाघाचे कातडे जवळ असले तरी प्राण्यांना वासामुळे तिथे वाघच आहे असा आभास होतो आणि कोणी वन्य प्राणी-पक्षी साधकाच्या जवळपास फिरकत नाही. मृगाजिनालाही एक सूक्ष्म गंध असतो. या गंधाचा फायदा असा की त्यामुळेच हिंस्त्र श्वापदे साधकाच्या जवळ येत नाहीत. मृग मेल्यानंतर त्याच्या कातड्याचा गंध वेगाने बदलतो. जिवंत असताना गंध वेगळा आणि मेल्यानंतर निराळा. हा फरक वाघ, सिंह यांसारख्या श्वापदांना कळतो आणि मेलेल्या जनावरापाशी ते फिरकत नाहीत. वनामध्ये साधना करणाऱ्या साधुसंतांना ही प्राण्यांच्या कातड्याची आसने म्हणजे एक प्रकारचे संरक्षक कवच असते. हा सगळा गंधमहिमा आहे. कस्तुरीमृगाला आपल्या बेंबीच्या गाठीत सुगंधी द्रव्य आहे हे ठाऊक नसते. तो त्या सुगंधाच्या शोधात अस्वस्थ असतो, तद्वतच माणसाच्या हृदयामध्ये असणारा परमेश्वर त्याला गवसत नाही. माणूस परमेश्वराच्या शोधात उगाचच भटकत असतो. प्रत्येक माणसाच्या शरीराला एक गंध असतो. त्याला मनुष्यगंध असे म्हणतात. परमेश्वराच्या नामस्मरणामुळे हा मनुष्यगंध नाहीसा होतो आणि त्याची जागा सुगंध घेतो. माणसाचे शरीर हे सुगंधी झाले की देवता त्याच्यापाशी रेंगाळतात. सुगंध, दुर्गंध माणसांपर्यंत पोहचवण्याचे कार्य वारा करतो. श्री दत्तप्रभूंनी वायूला गुरू केले कारण तो गंधामध्ये लिप्त न होता गंधहीन होतो. त्याप्रमाणे स्थूल देहात राहून वायूप्रमाणे साधकाने अनासक्त राहावे असे दत्तगुरू म्हणतात. सुगंध आणि चंदन यांचेही अतूट नाते आहे. सहाणेवर चंदनी खोड घासले की सुगंध दरवळतो. हे गंधविलेपन भगवंताला आवडते. श्रीकृष्णाप्रती निरपेक्ष प्रेम आणि जिव्हाळा यामुळे गोपींचा देह चंदनाचा झाला. सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आहे ते माणसाचे मन. ते विठ्ठलचरणाशी रममाण झाले की मनाला सुगंध प्राप्त होतो. हा सुमनसुगंध सर्वांना आनंद देतो.
-स्नेहा शिनखेडे








