पावसाच्या विश्रांतीमुळे गोमंतकीयांमध्ये उत्साह : महागाईचा परिणाम नाही,सगळीकडे मंगलमय वातावरण
पणजी : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात गणेश चतुर्थी. या सणाच्या स्वागताची गेले पंधरा दिवस सुरू असलेली तयारी पूर्ण झाली आहे. आज सकाळी श्री गणेशाची महापूजा घरोघरी होणार आहे. प्रथा परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस वा नऊ दिवस याप्रमाणे घरात गणेशमूर्तींची पूजा, आरत्या इत्यादी भरगच्च कार्यक्रम होतील. गणेशमूर्तींचे घरोघरी आगमन झालेले आहे. राज्यातील जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
राज्यात आजपासून गणेशचतुर्थी उत्सवास जोरदार प्रारंभ होत आहे. गेले कित्येक दिवस श्री गणेशाच्या स्वागतासाठी चालू असलेल्या तयारीवर भक्तमंडळींनी शेवटचा हात फिरवला. आज पहाटेपासूनच गोव्यात सर्वत्र श्री गणेश महापूजेला प्रारंभ होत आहे. महागाई वाढलेली असली तरीदेखील नागरिकांच्या उत्साहात कोणताही फरक पडलेला नाही. बाजारात व्यापाऱ्यांनी भाजीचे दर प्रचंड वाढविले. भेंडी प्रतीकिलो 100 रु. तर घेवडा रु. 160 प्रतीकिलो, कोथंबीर जुडीचा दर 60 रु. ठेवण्यात आला होता. यंदा माटोळीच्या साहित्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. माटोळी परवडणारी नाही असाच प्रकार आढळून आला. यंदा गणेशमूर्तीचे दरही वाढलेले आहेत.
गोव्यात गणेश चतुर्थी उत्सव सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. प्रत्येक घरात स्वतंत्रपणे गणेशमूर्तीचे पूजन करून उत्सव साजरा केला जातो. घरोघरी आजपासून टाळ, मृदंग, तबला व पेटीचे सूर ऐकायला मिळतील. घरोघरी आरत्या व भजने त्याचबरोबर गोडधोड पदार्थांची रेलचेल असणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी विशेषत: ग्रामीण भागात उत्साहाला उधाण आलेले आहे. विविध शहरांत कामासाठी जाणारी माणसे गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या मूळ गावातील घरात पोहोचतात. त्यामुळेच गावात एक उत्साही वातावरण पसरलेले असते.
चतुर्थीनिमित्त राज्यातील बाजारपेठांमध्ये दिवसभर साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने उत्साहाला बहर आला आहे. बालगोपाळ मंडळींना सध्या चतुर्थीची सुट्टी असल्याने घरामध्ये पालक मंडळींचा उत्साह द्विगुणीत झालेला आहे. महिलावर्ग विविध खाद्यपदार्थ विशेषत: नेवऱ्या, मोदक व इतर पदार्थ बनविण्यात गर्क होती. तर घरातील प्रमुख मंडळी बाजारातून साहित्य खरेदी करण्यात आणि मखर सजावट तथा देखावा उभा करण्यात गर्क होती. आजपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त एकंदरितच गोव्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. चतुर्थी उत्सवात मोठ्या प्रमाणात दारुकामाची आतषबाजी होत असते. त्यासाठी अनेकविध दारुकामाचे प्रकार गोव्यातील विविध बाजारपेठांमध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहेत.









