रिमझिम पावसात आगमन : अपूर्व उत्साहात घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना : बॅन्ड, सनई-चौघड्यांना अच्छे दिन
बेळगाव : सर्व विघ्नांचे निवारण करून आपल्या भक्तांवर कायम कृपा करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाचे मंगळवारी अत्यंत जल्लोषात व तितक्मयाच श्र्रद्धेने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरोघरीसुद्धा श्रीमूर्तींची अत्यंत श्र्रद्धेने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. बेळगावचा गणेशोत्सव हा अत्यंत वैशिष्ट्यापूर्ण असा आहे. मिरवणूक पाहण्यास परगावातूनही लोक येत असतात. बेळगावात आज 378 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत आणि दरवषी अपूर्व उत्साहामध्ये ते श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करून दहा दिवस हा उत्साह यशस्वी करतात. मागील महिन्याभरापासून गणेशमूर्ती ठरविणे, त्यानंतर त्यावर धोतर, फेटा तसेच स्टोनचे वर्क करणे यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. आपल्याला हव्या त्या आकारातील, रुपातील गणेशमूर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी मूर्तीकारांकडून गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी शहर तसेच परिसरात गर्दी झाली होती. मंगळवारी सकाळी घरातील ज्येष्ठ मंडळींनी बालचमूसमवेत मूर्तीशाळांमध्ये जाऊन श्रीमूर्ती आणली. काही हौशी मंडळींनी मूर्तीशाळांपासून आपल्या घरापर्यंत श्रीमूर्तींची सवाद्य मिरवणूकही काढली. त्यामुळे मंगळवारी वाजंत्री मंडळींना चांगलीच मागणी होती. श्रीमूर्ती आणताच घराच्या प्रवेशद्वाराजवळच महिलांनी मूर्तीच्या पायावर दूध अर्पण करून व औक्षण करून मूर्तीला आत घेतले. त्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
घरोघरी श्रीमूर्तींच्या प्रतिष्ठापणासाठी जय्यत तयारी करण्यात आली होतीच. परंतु मूर्तीच्या सभोवती झिरमिळ्या दिवे, विद्युत माळा, पडदे सिंहासन अशा स्वरूपाची आरासही केल्याचे पाहायला मिळाले. घरांमध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेची धांदल असल्याने भटजी मंडळींचीही धांदल उडाली. विधिवत पूजा केल्यानंतर आरती झाली. मोदक, पुरणपोळी व अन्य पक्वानांसह सर्वांचे सहभोजन झाले. काही घरांमध्ये मोदक किंवा पुरणपोळी याबरोबरच सोळा प्रकारच्या भाज्या घालून तयार केलेले खतखते हा पदार्थही करण्यात आला. महिलांनी आपल्या परिचितांमध्ये तसेच शेजारीपाजारी ताटे पोचवली. भोजन होताच तऊणाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आणण्यासाठी सज्ज झाली. पारंपरिक पोशाख, कपाळावर केशरी नाम ओढून, डोक्मयावर मंगलमूर्ती मोरया बाप्पा अशी अक्षरे लिहिलेल्या टोप्या परिधान करून उत्साहाने वावरणारे तऊण प्रत्येक मंडळांमध्येच दिसत होते. काही मंडळांनी दोन दिवस आधीच सार्वजनिक श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तथापि मंगळवारी सार्वजनिक मंडपामध्ये श्रीमूर्तीची स्थापना करणाऱ्या मंडळांची संख्या अधिक होती. रात्री उशिरापर्यंत मूर्ती प्रतिष्ठापणाचा उत्साह अखंड सुरू होता.
रिमझीम पावसात आगमन
विशेषत: शहापूरमधील एसपीएम रोड, नाथ पै चौक, टिळक चौक, गणपत गल्ली, मारुती गल्ली, काकतीवेस रोड, धर्मवीर संभाजी चौक येथे गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी भाविकांची गर्दी होती. रिमझीम पाऊस असल्यामुळे गणेशमूर्ती घरी घेवून जाण्यामध्ये काहीसा व्यत्यय येत होता. पावसाचा जोर कमी होताच भाविकांची गर्दी होत होती. यावर्षी दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार, बैलगाड्यांमधून ढोल-ताशांच्या गजरात, सनई चौघड्याच्या मंगल सुरात लाडक्या गणरायाचे आगमन झाले. मंगळवारी सकाळपासूनच शहर व उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस असल्यामुळे गणेश भक्तांना गणेशमूर्ती आणताना तारेवरची कसरत करावी लागली. पावसात भिजल्यास गणेशमूर्तींचा रंग जावू नये, यासाठी प्लास्टीक पिशवी घालून मूर्ती घरी आणाव्या लागल्या. पावसामुळे कार तसेच चार चाकी वाहनांतून गणेशमूर्ती आणण्याचे प्रमाण यावर्षी वाढल्याचे दिसून आले. वडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिकपणा जपत बैलगाडीतून मिरवणूक काढत गणेशमूर्ती घरी आणल्या. वाहनांना फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. मोदक व पूजेचे साहित्य खरेदीसाठी मंगळवारीही तुफान गर्दी होती. विशेषत: बाजारपेठ परिसरात भाविकांची गर्दी असल्याचे दिसून आले.
बॅन्ड, सनई-चौघड्यांना अच्छे दिन
केवळ लग्नसराईमध्ये बॅन्ड, सनई-चौघडे यांचे वादन केले जाते. इतरवेळी वादकांना रोजगारासाठी इतर व्यवसायांवर अवलंबून रहावे लागते. परंतु मागील काही वर्षांपासून फटाक्यांना बाजूला सारत बॅन्ड व सनई चौघड्यांच्या मंगलमय सुरात गणेशमूर्तींचे स्वागत करण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामुळेच मंगळवारी ज्या ज्या ठिकाणी मूर्तीकारांची संख्या जास्त आहे त्या त्या ठिकाणी बॅन्ड व सनई-चौघडे याचबरोबर ढोल-ताशा वाजविणारे वादक उपलब्ध होते. मूर्तीकारांपासून घरापर्यंत हे वादक वादन करीत होते.
क्रेझ कुर्त्यांची
मागील काही वर्षांत गल्लोगल्ली मंडळांच्या नावांचे टिशर्ट काढण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु यावर्षी शहरातील अधिकतर मंडळे तसेच मोठ्या कुटुंबांनी एकाच रंगाचे कुर्ते घालण्याची क्रेझ दिसून आली. ही क्रेझ पाहून शहरातील बऱ्याच दुकानदारांनी विविध रंगांमधील कुर्ते मागविले होते. काही मंडळांनी आपल्या गणेशमूर्तींचे चित्र कुर्त्यांवर प्रिंट करुन घेतले होते. पुरुष मंडळेंनी कुर्ते तर महिलांनी एकाच रंगातील साड्या परिधान केल्याचे चित्र मंगळवारी दिसले.









