गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष : गणरायाच्या आगमनाने भाविकांमध्ये उत्साह, फटाक्यांची आतषबाजी
वार्ताहर /किणये
तालुक्यात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. गणेशमूर्ती आणताना भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. तालुक्यात सर्वत्र एक नवचैतन्य निर्माण झाले होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत गणपती मूर्ती आणताना भक्त दिसत होते. फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक व ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले. सकाळी घरगुती मूर्ती आणण्यात आल्या. तर दुपारनंतर विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती आणण्यात आल्या. यंदा मंगळवारच्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे भक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.
सकाळी दुचाकी, कार, टेम्पो आदी वाहनांतून भाविक गणेशमूर्ती आणत होते. मूर्तिकारांनी यंदा विविध आकर्षक अशा गणेशमूर्ती केल्या होत्या. काहीजण चालत डोक्यावरून गणपती बाप्पाला आणत होते. घरगुती मूर्तींसाठी भक्तांनी आपापल्या घरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे. घरगुती गणेशमूर्ती घरासमोर आणल्यानंतर महिला आरती करून गणेशाचे घरामध्ये स्वागत करतानाचे चित्र पहावयास मिळाले. विधिवत पूजा, अर्चा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळाच्यावतीने गेल्या पंधरा दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी आकर्षक असे मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडप सजावटीचे कामकाज जोमाने सुरू होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत मंडप सजावट करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ट्रॅक्टर, टेम्पोमधून गणेशमूर्ती आणल्या. या ट्रॅक्टर टेम्पोची हार, फुलांनी सजावट केली होती.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांचे आगमन
काही गावांमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात तर बहुतांशी ठिकाणी ढोल, ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भक्तांनी भगव्या टोप्या परिधान केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचीही विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी पावसाची रिमझिम झाली. मात्र जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर भक्तांनी यंदा चांगला पाऊस पडू दे आणि पीक पाणी जगू दे असे साकडे घातले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून येत्या दहा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा सण एक आनंदची पर्वणी ठरणार आहे.









