प्रतिनिधी,सांगली
सांगली संस्थानसह घरगुती गणपतीचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते हे माहीत असताना महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने शेरी नाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांतून संताप व्यक्त होत आहे.
विसर्जनासाठी हजारो सांगलीकर पाण्यात उतरत असतात. सध्या नदीत केवळ शेरीनाल्याचे पाणी असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोयना धरण व्यवस्थापनाने सिंचन योजनांची मागणी आहे असे सांगली पाटबंधारे विभागाने दिलेले कारण मान्य करून 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सुरु केला आहे. हे पाणी बारा तासात पोहोचेल असा अंदाज गृहीत धरून त्यात शेरीनाला सोडून देण्याचा संतापजनक प्रकार सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्षात बारा तासात हे पाणी सांगलीत न पोहोचल्याने महापालिकेचा हा काळा कारनामा उघड झाला आहे.
सांगलीचे माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी यांनी महापालिकेची पोलखोल करत याबाबतची छायाचित्रे आणि नदीत गटारगंगा सोडलेला व्हिडिओ प्रसारित केला आहे. पाचव्या दिवशी सांगलीत मोठ्या प्रमाणावर विसर्जन केले जाते. संस्थानच्या गणपतीचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन करताना प्रत्येकवर्षी लोक पाण्यात उतरतात, हे माहीत असताना नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाला आहे, असा आरोप सूर्यवंशी यांनी तरुण भारत संवादशी बोलताना केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
शनिवारी सकाळी कृष्णा नदीत कोयनेचे पाणी आले असेल म्हणून पोहण्यास आलेल्या नागरिकांना नदीत केवळ शेरीनाल्याचे पाणी आहे हे लक्षात आल्याने त्यांनी अनेकांना पाण्यात उतरण्यापासून रोखले. पाटबंधारेने सोडलेले पाणी अद्याप सांगलीत पोहोचलेले नाही. त्यामुळे महापालिकेने नदीत सोडलेल्या या गटारीच्या पाण्यात कोणीही पोहू नये अशी सूचना ज्येष्ठ जलतरणपटूंकडून करण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाण्यात उतरणे रहीत केले. मात्र विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना अशी सूचना कोणाकडूनही मिळण्याची शक्यता नसल्याने हा प्रकार म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच होणार आहे.
याबाबत बोलताना जलतरण प्रशिक्षक आणि विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण तरुण भारत संवादशी बोलताना म्हणाले, आज विसर्जन आहे हे माहीत असताना निष्काळजीपणा करणे योग्य नव्हते.
पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या ड्रेनेज विभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे इतक्या बेपर्वाईने पाहणे संताप आणणारे आहे. नागरिकांनीच आता पाण्यात उतरण्यापासून आणि आपली मूर्ती नदीत विसर्जित करण्यापासून स्वतःला रोखावे असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.