आता कायद्यात रुपांतर : ऑनलाईन गेमिंकवर बंदी येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑनलाईन आणि पैशाचे व्यवहार असणाऱ्या गेमिंगवर बंदी घालण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. हे विधेयक गुरुवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी संसदेने संमत केले होते.
हा कायदा आता अस्तित्वात आल्याने फँटसी लीग, कार्ड गेम्स, ऑनलाईन लॉटरी, पोकर, ऑनलाईन रमी तसेच ऑनलाईन सट्टेबाजी चालविणाऱ्या मोबाईल अॅप्सवर बंदी आणणे केंद्र सरकारला शक्य होणार आहे. अनेक अशा अॅप्सवर शुक्रवारपासूनच बंदी घोषित करण्यात आली आहे. या गेमिंगच्या व्यसनापायी अनेक युवकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तसेच अशा अॅप्समधून ग्राहकांची फसवणूक झाल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत. सध्याच्या काळात अशा अॅप्सचा सुळसुळाट झाला होता. आता या कायद्यामुळे या अॅप्सवर बंदी येणार आहे.
समाजासमोर आव्हान
गेमिंगच्या व्यसनामुळे संपूर्ण समाजासमोरच मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेकांनी या गेमिंगच्या मोहापायी आपले स्वकष्टार्जित पैसे गमावले असून त्यांच्यावर आता निर्धन होण्याची वेळ आली आहे. अशा अॅप्सवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा केल्याखेरीज त्यांच्यावर आळा घालता येणे अशक्य होते. त्यामुळे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले होते. विरोधकांनी घातलेल्या गोंधळातही हे विधेयक संमत करून घेण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. त्यामुळे आता लोकांची फसवणून आणि आर्थिक शोषण करणाऱ्या या माध्यमांना नष्ट करणे केंद्र सरकारला शक्य होणार आहे. अनेक सामाजिक संस्थांनीही केंद्र सरकारच्या या कायद्याचे मन:पूर्वक स्वागत केले आहे. या नव्या कायद्याचे कार्यान्वयन शुक्रवारपासूनच करण्यात आल्याची घोषणा केली गेली आहे.









