रोलबॉल…हा एक सांघिक खेळ…बास्केटबॉल, हँडबॉल नि रोलर स्पोर्ट्सच्या पैलूंना तो एकत्रित करतो. या प्रकारात सर्व खेळाडू ‘रोलर स्केट्स’वर असतात आणि विरोधी संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू हाणून गोल करणं हे उद्दिष्ट असतं…महत्त्वाची बाब म्हणजे रोलबॉलचा जनक भारत असून सध्या जगातील सुमारे 50 हून अधिक देशांमध्ये तो खेळला जातो…
- 2003 मध्ये राजू दाभाडे हे कोथरूडमधील बालशिक्षण मंदिर इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक असताना विविध खेळांच्या बाबतीत प्रयोग करून पाहत होते आणि त्यांचे मिश्रण करून नवीन खेळाची उत्पत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता..त्यातून रोलबॉल उदयाला आला…
- सुऊवातीच्या दिवसांबद्दल माहिती देताना दाभाडे यांनी सांगितल्याप्रमाणे तेव्हा ते मुलांना स्पीड स्केटिंग शिकवायचे…एके दिवशी ते आणि इतर प्रशिक्षक मुलांच्या खेळाचे निरीक्षण करत असताना त्यांच्या मनात विचार आला की, हॉकी, बास्केटबॉल आणि स्केटिंगला एकत्र का जोडू नये ? त्यातून काही मुलांना स्केट्स घालून ‘बास्केटबॉल ड्रिब्लिंग’ करायला सांगितलं गेलं. ते तसे खेळल्यानंतर त्यांची संकल्पना पुढे जाण्यास मदत झाली. खूप विचार केल्यानंतर दाभाडे यांनी या नवीन खेळाची नोंदणी केली आणि पुढे अधिकाधिक खेळाडूंनी त्यात रस दाखवायला सुऊवात केली…
- त्यानंतर रोलबॉल जगासमोर सादर करण्यात येऊन आंतरराष्ट्रीय रोलबॉल महासंघाची स्थापना झाली तसेच खेळाला केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाकडूनही मान्यता देण्यात आली…या खेळाचे जगभरात आज हजारो खेळाडू असून रोलबॉल वर्ल्ड कप आणि दक्षिण आशियाई स्पर्धेत जपान, मलेशिया, सिंगापूर, पाकिस्तान, डेन्मार्क, जर्मनी, आयर्लंड, ब्रिटन, नेदरलँड्स, स्वीडन, बेल्जियम, चीन, नेपाळसह कित्येक देश उतरतात…
- रोलबॉल हा खेळ मैदानात आणि इनडोअर अशा दोन्ही ठिकाणी आणि लाकडी किंवा डांबरी पृष्ठभागावरही खेळला जाऊ शकतो. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या रोलबॉलची वेगळी आवृत्ती देखील आहे…खेळण्याचं क्षेत्र वरिष्ठ स्तरासाठी 40 मीटर लांब आणि 20 मीटर ऊंद असतं. बास्केटबॉलसारख्या आकाराचा चेंडू वापरला जातो, तर गोलपोस्टचा आकार हँडबॉल गोलपोस्टसारखा…
- एका संघात 12 खेळाडू असतात, त्यापैकी 6 राखीव. प्रत्यक्ष मैदानात प्रत्येकी 6 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये सामना खेळला जातो. प्रत्येक संघात एक गोलरक्षक राहतो…सामना कोणत्या स्तरावरचा आहे त्यानुसार कालावधी बदलतो. वरिष्ठ स्तरावर सामने 25 मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये खेळले जातात…
- खेळाडूंना चेंडू घेऊन जाण्याची परवानगी नसते. चेंडू फेकून वा ड्रिब्लिंग किंवा पासिंगद्वारे कुठल्याही दिशेनं नेला जाऊ शकतो. ‘ड्रिब्लिंग’ करताना बास्केटबॉलच्या विपरित खेळाडूंना दोन्ही हात वापरण्याची परवानगी असते, तर ‘बॅक पास’ला अनुमती नाही…
- रोलबॉलची दर दोन वर्षांनी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाते, ती या खेळातील सर्वोच्च स्पर्धा. 2011 मध्ये पहिला रोलबॉल वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला…गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये पदकांसाठीचा खेळ म्हणून त्याची प्रथमच वर्णी लागली…
– राजू प्रभू









