चंद्रशेखर साखरे लाचप्रकरणाने चर्चेला पुष्टी : क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि विभागीय क्रीडा संकुलाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
कोल्हापूर / संजीव खाडे
जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे मंगळवारी 1 लाख 10 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर जिल्ह्यासह राज्याच्या क्रीडा जगतात खळबळ उडाली. आजवर क्रीडा कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्याला साखरे प्रकरणामुळे पुष्टी मिळाली आहे. प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने क्रीडाधिकाऱ्यांचे फावत आहे. ते बेफाम बनले आहेत, असेही थेटपणे क्रीडा क्षेत्रात बोलले जात आहे. साखरे सापडल्यानंतर आता क्रीडाधिकारी कार्यालयासह क्रीडा उपसंचालक कार्यालय आणि विभागीय क्रीडा संकुल (या दोन्हींवर जिल्हा क्रीडाधिकारी आणि क्रीडा उपसंचालक यांचे नियंत्रण असते.) यांचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.
शासनाच्या पोलीस, महसूल, पाटबंधारे, शिक्षण विभागासह अन्य विभागातील भ्रष्टाचाराची चर्चा नेहमी सुरू असते. आता भ्रष्टाचारापासून क्रीडा विभागही दूर नसल्याचे साखरे प्रकरणाने पुढे आले आहे. या विभागातील भ्रष्टाचाराच्या चर्चेला साखरे सापडल्यानंतर जी पुष्टी मिळाली आहे, हे घडवून आणण्यामागे क्रीडा विभागातील काही अल्पसंतुष्ट असल्याचीही चर्चा आहे.
प्रशासनावर अंकुश नाही, क्रीडाधिकारी बेफाम
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय असो, विभागीय क्रीडा संकुल असो वा क्रीडा उपसंचालक कार्यालय, शासनाच्या या विभागातील कार्यालयांवर, तेथील प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही. स्थानिक स्तरावर आजी, माजी खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशिक्षकांची क्रीडा प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारी समितीच गठित केली नसल्याने काही क्रीडाधिकारी बेफाम झाले आहेत. खेळ आणि खेळाडूंच्या विकासाऐवजी स्वत:च्या विकासाची अधिकाऱ्यांत स्पर्धा लागली आहे. त्यातून भ्रष्ट, अनियमित कारभाराला चालना मिळत आहे. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातून स्पर्धा आयोजनापासून खेळांचे साहित्य खरेदी, व्यायामशाळा उभारणीसाठी निधी असो वा त्यासाठीचे कंत्राट असो, प्रशिक्षक, मार्गदर्शक नियुक्ती असो वा विविध जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी निवड असो यामध्ये आर्थिक व्यवहार, लेन-देन असल्याची आजवर चर्चा होती. साखरे प्रकरणाने ही चर्चा वास्तव असल्याचे अधोरेखित झाले आहे.
क्रीडाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रूबाब
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर क्रीडाधिकारी व तालुका क्रीडाधिकाऱ्यांची शासकीय सेवेत रूजू झाल्यापासून काहीच वर्षांत उंचावलेला आर्थिक स्तरही खेळाडू, प्रशिक्षकांत उत्सुकतेचा विषय आहे. अनेक क्रीडाधिकाऱ्यांचा संपत्ती वाढल्यानंतर वाढलेला रूबाबही चक्रावणारा आहे. साखरे प्रकरणानंतर संपत्ती वाढलेले धास्तावले आहेत.
साहित्य खरेदी आणि कामांच्या टेंडरमध्ये अर्थपूर्ण व्यवहार
क्रीडाधिकारी कार्यालयाबरोबर कोल्हापूरमध्ये जे विभागीय क्रीडा संकूल साकारले जात आहे. त्यामध्ये साहित्य खरेदी आणि विविध बांधकामे, फर्निचर खरेदीमध्ये टेंडर प्रक्रिया राबवली जाते. त्यामध्ये दर्जा आणि गुणवत्तेला फाटा दिल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखेंसह क्रीडा संघटकांनी केले आहेत. विभागीय क्रीडा संकुलातील विविध खेळांची मैदाने, जलतरण तलाव आणि शूटिंग रेंजच्या कामाचा दर्जा वादाचा विषय ठरला होता. नियमानुसार, दर्जेदार कामे होत नाहीत, कामांची वेळेवर पूर्तता झालेली नाही, 35 ते 40 टक्के कामे झाली असताना 85 टक्के कामे झाल्याचे त्यावेळी क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडाधिकारीपदाचा चार्ज एकाच व्यक्तीकडे असणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले होते. जेंव्हा क्रीडा संघटनांनी विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करा, अशी मागणी केली तेंव्हा मात्र सटपटलेल्या अधिकाऱ्यांनी मागणी करणाऱ्यांवर नेत्यांकडून दबाव आणण्याचेही प्रयत्न केले होते. त्यालाही ऑडिटची मागणी करणाऱ्यांनी दाद न दिल्याने तोडपाण्याचेही प्रयत्न झाले. त्याला यश न आल्याने अखेर ऑडिटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली.
आज थर्ड पार्टी ऑडिटचे काय झाले? हे कळत नाही. मात्र साखरे प्रकरणाने क्रीडाधिकारी कार्यालयातील खरेदी असो वा विभागीय क्रीडा संकुलातील बांधकामे असोत, फर्निचर खरेदी असो, यामध्ये झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी होणे गरजेचे आहे. शासनस्तरावर क्रीडा विभाग, क्रीडा कार्यालयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. केवळ मिशन ऑलिम्पिकच्या गप्पा मारल्या जातात. खेळ आणि खेळाडू तयार विकसित करणाऱ्या क्रीडा विभागात जर भ्रष्टाचाराची वाळवी आणखीन वाढत गेली तर खेळ आणि खेळाडूंबरोबर समाजासाठीही ते घातक ठरणार आहे.
दोनवेळा झालेली बदली कशी झाली रद्द
लाच प्रकरणात सापडलेल्या चंद्रशेखर साखरेंची दोनदा बदली झाली. ती त्यांनी रद्द करून आणली आणि पुन्हा ते जिल्हा क्रीडाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसले. त्यांची याआधीची सांगलीतील कारकीर्द गाजली होती. अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप असताना त्यांची बदली रद्द कशी होते? या प्रकाराची चौकशी होणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
एका ठेकेदाराकडून तीन कोटेशन आणि त्यालाच दिले काम
साखरे यांनी 8 लाख 98 हजार 200 रूपयांच्या कामाचे बिल पास करण्यासाठी 1 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना साखरे सापडले. त्यानंतर आता साखरेंच्या अनियमित कारभाराच्या सुरस कथांची चर्चा ऐकायला मिळत आहे. अनेक कामे टेंडर प्रक्रिया न राबवता एकाच ठेकेदाराकडून तीन कोटेशन घेऊन त्याला काम दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये शिवाजी स्टेडियममधील आणि संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील कामांसह फर्निचर खरेदीचा समावेश होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.









