वृत्तसंस्था / अबुधाबी
येथे सुरू असलेल्या विश्व टेनिस लिग सांघिक स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या लढतीमध्ये गेम चेंजर्स फाल्कन्सने टीएसएल हॉक्सचा 29-26 अशा फरकाने पराभव केला. गेम चेंजर्स फाल्कन्सच्या विजयामध्ये रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.
हा सामना सुपरशुटआऊटपर्यंत लांबला गेला. या लढतीत साबालेंका आणि अॅन्ड्रीव्हा यांनी टीएसएल हॉक्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रायबाकिना आणि गार्सीया यांनी गेम चेजर्स फाल्कन्सला 2-2 असे बरोबरीत नेले. त्यानंतर फाल्कन्सने टीएसएल हॉक्सवर 4-2 अशी आघाडी मिळविली. सातव्या गेममध्ये हॉक्सने कडवी लढत देत 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर हा सेट टायब्रेकरमध्ये गेला आणि पुन्हा दोन्ही संघांनी 6-6 अशी बरोबरी साधली. शेवटी हॉक्सने हा सेट 7-6 असा जिंकून सलामीचा सामना जिंकला.
महिलांच्या एकेरीतील सामन्यात साबालेंकाने 5-0 अशी आघाडी मिळविली पण रायबाकिनाने पिछाडीवरुन मुसंडी मारत 5-5 अशी बरोबरी केली. हा सेट साबालेंकाने अखेर 7-6 असा जिंकून हॉक्सला 14-12 अशी आघाडी मिळवून दिली.
पुरुषांच्या दुहेरीत सुमित नागल आणि थॉमसन यांनी हॉक्सला 4-1 अशी बढत मिळवून दिली होती. दरम्यान रुबल्वेव्ह आणि शेफोव्हॅलोव्ह यांच्या दर्जेदार कामगिरीमुळे हा सेट पुन्हा 4-4 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर नागल आणि थॉमसन यांनी हा सेट 7-5 असा जिंकल्याने टीएसएल हॉक्सने गेम चेंजर्स फाल्कन्सवर 21-17 अशी आघाडी मिळवून दिली. पुरुष एकेरीत रुब्लेव्हने शानदार खेळाचे प्रदर्शन घडवित गेम चेंजर्स फाल्कन्सला ही लढत 29-26 अशा फरकाने जिंकून दिली.









