पुणे / वार्ताहर :
मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी घरफोडी करणार्या परप्रांतीय चोरट्याला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल २७ लाख ५० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मनिष जीवनलाल राय (वय २९ रा. सिंधु निवास बंगला, सांगवी रोड औंध, मूळ रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (वय ७५ ) यांनी तक्रार दिली आहे.
त्र्यंबकराव यांचा फर्टिलायझर निर्मीतीचा व्यवसाय असून त्यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिणे असा ३८ लाख ५० हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १८ ऑगस्टला घडली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला. आरोपी मनिष राय याने घरफोडी केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे, एसीपी आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या पथकाने केली.









