सोशल मीडियाचा होतोय वापर : निषेध फेरीमध्ये अधिकाधिक सीमावासियांनी सहभागी होण्याची गरज
बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी मराठीबहुल भाग कर्नाटकाला जोडण्यात आला. तेव्हापासून आजतागाहेत 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिक काळादिन पाळून निषेध फेरी काढतात. निषेध फेरीमध्ये अधिकाधिक सीमावासीय सहभागी व्हावेत, यासाठी विभागवार जागृती करण्यात येत आहे. बेळगाव, खानापूर, निपाणी येथे काळ्यादिनाची जागृती केली जात आहे. मागील 67 वर्षांपासून बेळगावमध्ये अन्यायाविरोधात मूक सायकल फेरी काढण्यात येते. तरुणाई सीमालढ्यापासून दूर जात आहे, असे सांगितले जात असले तरी मागील काही वर्षांत काळ्यादिनाच्या निषेध फेरीत सर्वाधिक तरुणांचा सहभाग असतो. पुढील पिढीही सीमालढ्यामध्ये अग्रणी राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सायकल फेरीच्या जागृतीसाठी विभागवार बैठका घेण्यात आल्या असून प्रत्येक गावागावात बैठका घेतल्या जात आहेत. बेळगावसह खानापूर व निपाणी येथेही मराठी भाषिक आपले व्यवहार बंद करून हरताळ पाळतात. तसेच शहरामधून निघणाऱ्या सायकल फेरीमध्ये सहभागी होतात. यावर्षीदेखील मोठ्या संख्येने सीमावासीय सायकलफेरीमध्ये सहभागी होतील, असा निर्धार मध्यवर्ती म. ए. समिती, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. याचबरोबर गावोगावी बैठका घेण्यात आल्या असून तरुणाईमध्ये जागृती केली जात आहे.
सोशल मीडिया ठरतेय प्रभावी माध्यम
काळ्यादिनी वेगवेगळ्या माध्यमातून हरताळ पाळला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी युवा समितीने ट्विटरवर ट्रेंड चालविला होता. ‘बेळगाव बिलाँग्स् टू महाराष्ट्र’ हा हॅशटॅग वापरून देशाचे लक्ष वेधण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर ‘यायला लागतंय’चे स्टेट्स ठेवले जात आहेत. धगधगता सीमाप्रश्न तरुणाईपर्यंत पोहोचविण्यामध्ये सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे.









