आणखी एक साथीदार फरार, 10 हजाराची चांदी जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
भोई गल्ली येथे झालेल्या चोरीप्रकरणी गजमनाळ, ता. बैलहोंगल येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून दहा हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महांतेश यल्लाप्पा बसरीमरद, मूळचा रा. गजमनाळ, ता. बैलहोंगल, सध्या रा. कडोलकर गल्ली असे त्याचे नाव आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश दामण्णावर, उपनिरीक्षक हुसेन केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला आहे.
भोई गल्ली येथील गणेश सतीश भंडारी व विशाल जयवंत कित्तूर यांच्या घरी चोरी झाल्याचे शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. याच परिसरातील प्रतीक चव्हाण यांचे घर फोडण्याचाही प्रयत्न झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून महांतेशला अटक करून विशाल कित्तूर यांच्या घरातून चोरलेले चांदीचे दागिने जप्त केले आहेत. देव्हाऱ्यावरील चांदीचा मुखवटा, पादुका, कडे चोरण्यात आले होते. पोलीस फरारी आरोपीचा शोध घेत आहेत.









