भक्त परिवार केंद्रातर्फे आयोजन : सामुदायिक पारायण, पालखी, महाप्रसादाने सांगता
► प्रतिनिधी / बेळगाव
शांतीनगर, मंडोळी रोड येथील श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे 147 वा प्रगट दिन उत्सव दि. 19 व 20 रोजी भक्तिभावाने पार पडला. बुधवारी सकाळी काकड आरती, श्रींच्या पादुकांवर दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथ अध्यायाचे सामुदायिक पारायण झाल्यानंतर पालखी निघाली. सायंकाळी आरती व प्रसाद झाला.
गुरुवार दि. 20 रोजी काकडआरती, अभिषेक झाल्यानंतर गजानन विजयग्रंथ 18 ते 21 चे पारायण करण्यात आले. त्यानंतर डॉ. विनोद गायकवाड यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते म्हणाले. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा हे परस्परांशी जोडले हाते. गजानन महाराज प्रथम अक्कलकोटला आले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन ते नाशिकला व तेथून शेगावला आले. त्यांच्या समाधीवेळी भक्तांनी आमची काळजी कोण घेणार असा प्रश्न विचारला, तेव्हा यापुढे मी शिर्डीमध्ये असेन तुम्ही साईबाबांच्याकडे जा, असे सांगितले होते. व त्याचवेळी शिर्डीमध्ये साईबाबांनी माझा भाऊ गेला म्हणून अकांत मांडला होता.
गजानन महाराजांनी प्रत्येक मनुष्य ईश्वर आहे, असे सांगितले. साईबाबांनी जात, धर्म, पंत यापलीकडे जाऊन माणूस पाहायला सांगितला. श्रद्धा आणि सबुरी ही दोन तत्त्वे त्यांनी दिली. आजच्या अशाश्वत स्वार्थ लोलुप, हव्यासयुक्त जीवनामध्ये या संतांची शिकवण मनाला व जगण्याला शांतता प्राप्त करून देते, असेही ते म्हणाले. यानंतर दुपारी 12.30 ते 3 महाप्रसाद झाला. सायंकाळी दैनंदिन उपासना, श्रींची आरती, 8 वाजता कीर्तन होऊन शेजारतीने सांगता झाली.









