दक्षिण आफ्रिकेत अटक : एनआयएची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
रा. स्व. संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गँगस्टर मोहम्मद गौस नियाज याला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अटक केली आहे. 2016 मध्ये रुद्रेश यांची हत्या झाली होती. हत्येनंतर फरार असलेल्या मोहम्मद गौस याला एनआयएने दक्षिण आफ्रिकेत अटक केली आहे.
2014 च्या मुंबई दंगलीत प्रमुख आरोपी असणारा मोहम्मद गौस नियाज हा रुद्रेश यांच्या हत्येनंतर देश सोडून फरार झाला होता. त्याच्याविषयी माहिती देणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी गुजरात दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) तो दक्षिण आफ्रिकेत असल्याचा सुगावा लागला. एसआयटीने याविषयी एनआयएला माहिती दिली. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांना मोहम्मद गौसविषयी माहिती दिली. तेथील अधिकाऱ्यांच्या मदतीने एनआयएच्या पथकाने मोहम्मद गौसला अटक केली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा म्होरक्या असणारा मोहम्मद गौस नियाज हा मोस्ट वॉन्टेड गँगस्टरही होता. त्याला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीला त्याला मुंबईला आणून चौकशी केली जाईल.
रा. स्व. संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची 16 ऑक्टोबर 2016 मध्ये बेंगळूरच्या शिवाजीनगरमधील कामराज रोडवर हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी 2016 मध्ये पाशा, अहमद, मुजीब उल्ला. शरिफ यांच्यासह पीएफआय संघटनेच्या अनेकांना अटक केली होती.









