बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी, वेंगुर्ला येथे गुन्हे केल्याचे उघड : आरोपींकडून कबुली
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी आणि वेंगुर्ला येथील सराफी दुकानातील दागिने पळविणाऱया जोडगोळीला हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 22 लाख 73 हजार 400 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आंतरराज्य गुन्हेगारांनी आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नायक, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम. एम. ताशिलदार, पोलीस उपनिरीक्षक एल. एल. पत्तेण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
रणधीर राजेंद्र भोसले (वय 29, रा. जत, जि. सांगली), लियाकत मुल्ला (वय 26, रा. उगारखुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 421 ग्रॅम सोन्याचे दागिने, 35 हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या सराफी पेढीतील दागिने लांबविल्या प्रकरणाचाही उलगडा झाला आहे. या जोडगोळीने बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, वेंगुर्ला व हुक्केरी येथे चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. हुक्केरी कोर्ट सर्कलजवळ पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन त्यांनी पलायन केले होते.
रणधीर भोसले हा अशा प्रकरणात तरबेज असून केवळ हुक्केरीच नव्हे तर गोकाक, रायबाग येथेही त्याने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. एखाद्या सराफी दुकानात प्रवेश करून दागिने खरेदी करायची. थोडी रक्कम देऊन उर्वरित पैसे फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्याचे सांगून सराफी व्यावसायिकांची फसवणूक केली जात होती. यासाठी मतदार ओळखपत्र, आधारकार्डही दिले जात होते. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या एका गुन्हय़ाचाही तपास लागला आहे.









