वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी भारताची तयारी जोरात सुरू आहे. इस्रो चालू आठवड्यात 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान पहिली चाचणी करणार आहे. इस्रो ‘टीव्ही-डी1’ या वाहनाच्या आधारे ही चाचणी करेल. या मोहिमेद्वारे अंतराळवीर क्रू मॉड्यूलमध्ये बसून अंतराळात जातील. 21 ऑक्टोबर रोजी चाचणीमध्ये, मॉड्यूल बाह्य अवकाशात पाठवले जाईल आणि नंतर पृथ्वीवर परत आणले जाईल. बंगालच्या उपसागरात ते यशस्वीपणे उतरवले जाणार असून भारतीय नौदलाचीही त्याच्यावर नजर राहणार आहे. यशस्वी अवतरणासाठी नौदलही सज्ज झाले आहे.









