अंतराळात मानव पाठविण्याच्या अभियानाला मोठे बळ, 2027 मध्ये अभियान साकारण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंतराळात मानव पाठविण्याच्या भारताच्या प्रस्तावित अभियानाला मोठे बळ प्राप्त झाले आहे. या यानाचे दुसरे प्रोपल्शन परीक्षणही यशस्वी झाले असून ही घटना या अभियानासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या यशस्वी परीक्षणानंतर भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो आता मानवाला अंतराळात घेऊन जाण्याच्या अगदी जवळ पोहचली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
भारताच्या या प्रस्तावित मानवी अंतराळ अभियानात सध्या अंतराळात असलेला अंतराळवीर शुभांशू शुक्ला याचाही समावेश होणार आहे. सध्या तो अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अंतराळ प्रयोगशाळेत वास्तव्य करीत आहे. तो 14 जुलैला पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. भारताच्या मानवी अंतराळ अभियानाचा एक भाग म्हणून त्याची अंतराळात जाण्यासाठी निवड झाली आहे. त्याच्या अनुभवाचा इस्रोला मोठा उपयोग होईल, अशी शक्यता आहे.
प्रोपल्शन यंत्रणा महत्वाची
कोणत्याही अंतराळ यानाच्या यशस्वी उ•ाणासाठी आणि अवकाश प्रवासासाठी यानाची प्रोपल्शन यंत्रणा भक्कम असणे महत्वाचे मानले जाते. यानाला अवकाशात प्रक्षेपित करण्याचे कार्य अग्निबाण करत असतो. एकदा अवकाशात पोहचल्यानंतर यानाला पूर्वनिर्धारित कक्षेत सुस्थिर करणे, यानाच्या प्रवासावर नियंत्रण ठेवणे आणि त्याला त्याच्या विशिष्ट कक्षेत भ्रमण करीत ठेवणे, हे कार्य प्रोपल्शन यंत्रणेला करायचे असते. तसेच यान पृथ्वीवर परतत असताना त्याचा वेग विशिष्ट प्रमाणात कमी करणे आणि यानाला पृथ्वीवर विशिष्ट स्थानी आणणे ही कार्येही याच यंत्रणेला करावी लागतात. त्यामुळे ही यंत्रणा यानाच्या एकंदर प्रवासात आणि सुरक्षिततेत निर्णायक भूमिका साकारत असते, अशी माहिती देण्यात आली आहे.
इंधनाच्या मिश्रणातून चलन
यानाच्या प्रोपल्शन यंत्रणेला चालविण्याचे कार्य या यंत्रणेतील मिश्र इंधनाकडून केले जाते. या इंधनाला ‘बायप्रोपेलंट’ असे म्हणतात. या इंधन व्यवस्थेचे दोन भाग असतात. द्रवरुप एपोगी मोटर्स आणि प्रतिक्रिया नियंत्रण व्यवस्था असे हे दोन भाग असतात. द्रवरुप एपोगी मोटर्स या व्यवस्थेच्या माध्यमातून यानाच्या मोठ्या हालचाली घडविल्या जातात आणि नियंत्रित केल्या जातात. तर प्रतिक्रिया नियंत्रण व्यवस्थेकडून यानाला वळविणे किंवा त्यांची स्थिती परिवर्तित करणे आदी महत्वाची कार्ये केली जातात. या दोन्ही व्यवस्थांचे परीक्षण शनिवारी व्यवस्थित पार पडले.
प्रारुप परीक्षण अपेक्षेप्रमाणे
यानाच्या अवकाशातील प्रवासाचे परीक्षण करण्यासाठी इस्रोने यानाचे एक प्रारुप साकारले होते. या प्रारुपावर परीक्षणे करण्यात आली. हे प्रारुप या यानासारखेच होते. त्यामुळे अवकाशात प्रत्यक्ष यानाचा प्रवास कसा होईल आणि या प्रवासात कोणत्या समस्या येऊ शकतात, याची माहिती इस्रोला या परीक्षणांमधून मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रोचे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ या परीक्षणाच्या परिणामांवर समाधानी असून भविष्यात आणखी काही परीक्षणे केली जाणार आहेत.
प्रगतीचा पुढचा टप्पा
अवकाशात मानवाला नेण्याचे आणि परत आणण्याचे हे अभियान यशस्वी झाल्यास इस्रोच्या प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला जाणार आहे. प्रोपल्शन व्यवस्था स्वदेशनिर्मित असून ती अंतराळात यशस्वी झाल्यास भारताला तिचा उपयोग आपल्या संरक्षण तंत्रज्ञान विकासातही करता येईल, असे तज्ञांचे मत आहे. मानवाला अवकाशात घेऊन जाणे आणि तेथून सुखरुप परत आणणे हे कार्य आतापर्यंत केवळ अमेरिका आणि रशिया या दोनच देशांनी केले आहे. भारताला यश मिळाल्यास भारत ही कामगिरी करणारा तिसरा देश होणार आहे.
दुणावला आत्मविश्वास
ड प्रोपल्शन यंत्रणेची सलग दोन परीक्षणे यशस्वी झाल्याने अभियानाला वेग
ड मानवाला अंतराळात नेण्याचे अभियान 2027 मध्ये हाती घेतले जाणार
ड अंतराळ तंत्रज्ञानाचा लाभ भारताला संरक्षण तंत्रज्ञान विकासातही होणार
ड सध्या अंतराळात असलेले शुभांशू शुल्काही अभियानात सहभागी होणार









