तानाजी पाटील यांची माहिती, माजी आ. अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
उचगाव/प्रतिनिधी
गडमुडशिंगी, ता. करवीर येथील केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या विद्यामंदिर या प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी ६ कोटी ८५ लाख ८२ हजार ७८० रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला आहे. हा निधी राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सीएसआर फंडातून मिळणार असून, माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती उपसरंपच तथा राजाराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील व सरपंच अश्विनी शिरगावे यांनी दिली.
तानाजी पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. दर्जेदार शिक्षण व पूरक उपक्रमांमुळे दोन्ही शाळांची पटसंख्या १२०० हून अधिक आहे. मात्र इमारतीची दुरवस्था झाली होती. शाळा १०० वर्षांपूर्वी स्थापन झाली असून, सध्याच्या इमारतीचे बांधकाम ७५ वर्षांपूर्वीचे आहे. शासकीय तंत्रनिकेतनकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असता इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे इमारत बांधकामास निधी मिळावा, असा प्रस्ताव विद्युत पारेषण कंपनीकडे दाखल केला होता. यासाठी अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी ६.८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.यावेळी सरंपच अश्विनी शिरगावे यांनी निधीसाठी पाठपुरावा केल्या बद्दल माजी आमदार अमल महाडिक यांचे आभार मानले. प्रस्ताव दाखल करण्यासाठी निवृत्त कृषी अधिकारी दिलीप दळवी, सर्जेराव धनवडे, प्रमोद चौगले, कृष्णात पाटील, मनोज चौगले यांनी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच जितेंद्र यशवंत, अशोक दांगट, अरूण शिरगावे, मुख्याध्यापक भारत भांगरे, हेमलता कोळेकर, अमित माळी, भगवान गोसावी, अर्जुन कोगे, संजय सोनुले, सूरज कांबळे आदी उपस्थित होते.
अशी होणार शाळेची हायटेक इमारत
यानिधीमुळे शाळेचा पूर्ण कायापालट होणार आहे. नवीन इमारतीमध्ये प्रशस्त वर्ग खोल्या, स्वतंत्र संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, तसेच शिक्षकांच्या करिता स्वतंत्र स्टाफ रूम, किचन व डायनिंग हॉल, शौचालय हे असणार आहे. तसेच शाळेसमोर सर्व सोयींनीयुक्त क्रीडांगण देखील तयार करण्यात येणार आहे.









