आणखीन दोन सदस्य संपर्कात, ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्याचा दावा
उचगाव / वार्ताहर
मोठ्या राजकीय नेत्यांना हाताशी धरून दबाव टाकून आधीच्या तारखेचा गडमुडशिंगी सरपंचांचा सदस्य अपात्रतेचा आदेश सोमवारीच काढला असल्याचा आरोप सौ. अश्विनी शिरगावे यांनी केला असून आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून पुणे विभागीय आयुक्तांच्या कडे अपिल दाखल करणार असून सदस्य अपात्रतेला स्थगिती घेणार व आपले पद ही शाबूत राहणार असल्याचे अश्विनी शिरगावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सतेज पाटील गटात मी सरपंच अश्विनी शिरगावे व दोन सदस्यांचा प्रवेश हा योग्य निर्णय होता. आपण प्रामाणिक व पारदर्शक कारभार केला असून उपसरपंचांच्या हुकूमशाहीला आव्हान दिले म्हणून हे अपात्र प्रकरण काढले असल्याचा आरोपही शिरगावे यांनी केला आहे. आणखीन दोन सदस्य आपल्याबरोबर येणार असल्याचा दावा यावेळी शिरगावे यांनी केला.
यावेळी बोलताना अश्विनी शिरगावे यांनी महिला सरपंच म्हणून आपण चोख व प्रामाणिक कारभार केला आहे. गटनेत्यांच्या हुकूमशाहीला न जुमानता कोऱ्या चेकवर सह्या न देता शासकीय निधी कुठे खर्च करायचा यावर प्रश्न उपस्थित केले. म्हणूनच आमच्या विरोधात तक्रारदार उभा करून अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला. अरुण शिरगावे यांनी गायरान जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार आहे. मात्र ही जागा वाढीव गावठाणात येते याची कागदपत्रे ही आहेत. तरीही या तक्रारीची दखल घेऊन गेल्या वर्षी माहे जूनमध्ये असेसमेंट वरून आपले पती अरुण शिरगावे यांचे नाव कमी केले. मात्र तत्कालीन ग्रामसेवक दत्ता धनगर यांनी माहे सप्टेंबर मध्ये पुन्हा अरुण शिरगावे यांचे नाव असलेला बोगस असेसमेंट उतारा तक्रारदारांना दिला. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंगही गायब झाले आहे .याबाबत रीतसर तक्रार ही देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी १६ तारखेला दिलेला अपात्र सदस्य पदाचा निकाल हा ऑनलाइन स्टेटमेंट ला दिसत नव्हता. राजकीय दबाव आणून तो सोमवारी दि.१९ रोजी करण्यात आल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल आमच्या गटाने नाही तर उपसरपंच पाटील यांनी केला आहे.आमचे मतदान प्रभाग क्रमांक दोन मध्येच आहे. आम्हांला गद्दार म्हणणारे महागद्दार आहेत.आमच्या प्रवेशाचा धक्का सहन होणार नाही म्हणून ते देवदर्शनाला गेले, न्याय देवतेवर आपला पूर्ण विश्वास असून पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून आपल्याला स्थगिती मिळून आपले पद आहे तसे राहील असा आम्हांला विश्वास आहे.आपल्या सोबत आणखीन दोन सदस्य सतेज पाटील गटात प्रवेश करतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाला डॉ. अशोकराव पाटील, माजी जि.प. सदस्य बाबासो माळी, संजय पाटील,अरुण शिरगावे, ग्रा.पं. सदस्या अलका सोनुले, छाया नेर्ले, तेजस्विनी सुर्यवंशी, रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील,दिलीप थोरात, सचिन पाटील, विष्णू पाटील, आनंदा बनकर, कृष्णात झांबरे, कृष्णात ठमके, पांडुरंग पाटील यांच्यासह गडमुडशिंगीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









