सरपंच अपात्र व एक बंडखोर सदस्य स्वग्रही
उचगाव/वार्ताहर
गेल्या आठवड्याभर गाजत असलेला गडमुडशिंगीतील सत्तांतराचा प्रयत्न अखेर सरपंच अपात्र व एक बंडखोर सदस्याच्या स्वगृही परतल्याने फसला आहे. बुधवारी स्वग्रही परतलेल्या सदस्य सरिता कांबळेसह नऊ सदस्यांचे कार्यकर्त्यांच्या गर्दीत स्वागत करीत सत्ताधारी महाडिक गटाच्या कै. शिवाजीराव कृष्णात पाटील शेतकरी सेवा आघाडीकडुन मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत आघाडी प्रमुख व उपसरपंच तानाजी पाटील यांनी या पुढील काळात विरोधकांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगत आक्रमक पवित्रा जाहीर केला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, आपण बाहेरगावी असताना विरोधकांनी सत्ताधारी आघाडी फोडण्याचा गल्लीच्छ प्रकार केला होता. यामुळे संपूर्ण गावांमध्ये संतापाची लाट पसरली होती. परंतु कार्यकर्त्यांना शब्द दिल्या नुसार गावात येऊन विस्कळीत झालेली सत्तेचे घडी पुन्हा बसवली असून आमच्या आघाडीतील सदस्यांना दिशाभूल करून व खोटे सांगून प्रवेशाचे षड्यंत्र रचले होते. ते सदस्य आता स्वग्रही परतले आहेत. जनतेने आमच्या आघाडीला बहुमताचा कौल दिला असून आमची आघाडी पाच वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही त्यांचे सदस्य फोडून जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान दिले.
दरम्यान बुधवारी गडमुडशिंगी ग्रामपंचायत सभागृहामध्ये नऊ सदस्य उपस्थित राहत आघाडी एकसंघ असल्याचा घोषणा दिल्या. स यावेळी स्वग्रही परतलेल्या सरिता कांबळे यांनी आपल्याला फसवून विरोधी गटाकडे प्रवेशासाठी नेण्यात आले होते. परंतु मी पुन्हा परत आले असून महाडिक गटासोबत कायम राहण्याचा शब्द दिला. यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, जितेंद्र यशवंत, अमित माळी, द्रौपदी सोनुले, संगीता गोसावी, इंदुबाई कोगे, संपदा पाटील,सरिता कांबळे व सत्ताधारी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडक्यात घडलेला घटनाक्रम
१७ जून रोजी सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह तीन सदस्यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केल्याने गडमुडशिंगी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्याचा दावा
१९ जून रोजी उपसरपंच तानाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरपंच सौ अश्विनी शिरगावे यांचे सदस्यत्व अपात्र झाल्याचे जाहीर करीत सत्ता आपल्याकडेच असल्याचा दावा
२० जून रोजी अपात्र सरपंच अश्विनी शिरगावे यांनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप करीत पुणे आयुक्तांकडे अपील करणार असल्याचे सांगितले.
२१ जून रोजी सरिता कांबळे या बंडखोर सदस्या स्वगृही परतल्याने महाडिक गटाची सत्ता अबाधित राहिल्याचे स्पष्ट
ग्रामपंचायत बलाबल
महाडिक गट
पुर्वी ११ सदस्य सध्या ९ सदस्य
सतेज पाटील गट
पूर्वी सहा सदस्य सध्या ७ सदस्य
(सरपंचाचे सदस्यत्व अपात्र घोषित)