वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाबमध्ये राष्ट्रीय राजमार्ग परिवहन प्राधिकरणाच्या 2 अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर सर्व प्रकल्प बंद करण्यात येतील, असा इशारा त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवतंसिंग मान यांना पत्र पाठवून दिला आहे. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली असून प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना त्रास दिला जात आहे. त्यांना राज्यसरकारकडून पुरेशी सुरक्षा दिली जात नाही. ही परिस्थिती त्वरित सुधारा, अशी सूचनाही गडकरी यांनी आपल्या पत्रात केली आहे.
जालंदर येथे प्राधिकरणाच्या एका इंजिनिअरला मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी आहे. अशा प्रकारे आणखी एका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. केंद्र सरकार पंजाब राज्यात मोठी गुंतवणूक करुन अनेक प्रकल्प साकारत आहे. मात्र, राज्य सरकारने या प्रकल्पाचे काम करणाऱ्यांना सुरक्षा पुरविली नाही, तर मात्र, हे प्रकल्प बंद करावे लागतील. त्यामुळे होणाऱ्या राज्याच्या हानीला राज्य सरकारच जबाबदार असेल. या पूर्वीही याच कारणास्तव तीन प्रकल्प बंद करण्यात आले आहेत, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादी आणि फुटीरतावादी डोके वर काढत आहेत. त्यांना काही स्थानिक देशविरोधी शक्तींचे साहाय्य आणि आश्रय मिळत आहे. सध्याच्या काळात अशा विकास विरोधी शक्तीचा सुळसुळाट राज्यात झाला असून राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानेही केला आहे.









