पुणे / प्रतिनिधी :
पक्षातून डावलले जात असल्याची कैफियत मांडत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळे यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजप नेत्या व कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूलाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी समाज माध्यमांवर पोस्ट लिहीत स्थानिक नेतृत्वावर निशाणा साधला होता. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांनी आपल्या ट्विटद्वारे व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी चव्हाटय़ावर आली होती. ‘माझ्यावरील कुरघोडय़ा, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही मी बोलले नाही. पण आता दु:ख मनात मावत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलावे वाटले. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले,’ असे ट्विट मेधा कुलकर्णी यांनी केले होते.
या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची दखल नितीन गडकरी यांनी घेतली. नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांची समजूत काढली. पक्षातील वरिष्ठांना भेटून विषय संपवण्याची सूचना त्यांनी या वेळी केली. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांच्या कानावर माझी नाराजी टाकली असून, वरिष्ठांनी मला वेळ दिल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. तसेच नितीन गडकरी घरी आल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मेधाताईंच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्प मार्गी : गडकरींची स्तुतीसुमने
नितीन गडकरी घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले. वरिष्ठ मला वेळ देणार आहेत. त्या वेळी मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दरम्यान, उड्डाणपूलाच्या लोकार्पण कार्यक्रमालाही कुलकर्णी यांनी उपस्थिती लावली. या वेळी गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले. मेधाताईंनी आमदार असल्यापासून सतत पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे गडकरी यांनी नमूद केले.








