केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गेल्या आठवडय़ात भाजपच्या सर्वोच्य मानल्या गेलेल्या पार्लमेंटरी बोर्डातून नारळ देण्यात आला. त्यांच्याप्रमाणे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना देखील असेच अकस्मात काढण्यात आले. गडकरी आणि शिवराज हे कोणी ऐरेगैरे नेते नव्हेत. ‘आगळावेगळा पक्ष’ अशी भाजपची छाप असताना गेल्या दशकात पक्षाचा सर्वात तरुण असा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा बहुमान गडकरींना मिळाला होता. त्यांना असे झटक्मयासरशी काढण्याचे कारण काय याबाबत राजकीय वर्तुळात देखील उलटसुलट चर्चा सुरु झाली. भाजपमध्ये वरून अळीमिळी गुप चिळी असली तरी तिथे देखील अलगद कुजबुज सुरु झाली आहे.

65 वर्षाचे गडकरी हे नरेंद्र मोदी सरकारातील कार्यक्षम मंत्र्यांपैकी केवळ एक नसून त्यांच्या कामामुळे ते याबाबत ‘नंबर एक’ मानले जातात. त्यांची अजून एक खुबी म्हणजे सत्ताधारी आघाडीतील नेते असोत अथवा विरोधी पक्षातील सर्वांशी त्यांचे केवळ चांगले संबंध नाहीत तर त्यांची सर्वांचीच कामे झपाटय़ाने करण्याची खुबी असल्याने ते सर्वत्र लोकप्रिय देखील आहेत. ‘एखाद्या मंत्र्याला दिल्लीत भेटले आणि आपले काम झाले अथवा मार्गी लागले’ असे सांगणारे लोक राज्याराज्यांत भेटतात. तो मंत्री बहुधा गडकरीच असतात. ज्यांची कामे अशी बिनबोभाट होतात त्यात भाजप विरोधकदेखील असतात.

‘पंत मेले आणि राव चढले’ या न्यायाने गडकरी यांची एकीकडे अशी गच्छन्ती झाली असताना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना ‘पदावनती’ स्वीकारावी लागली म्हणून त्यांना केंद्रीय समितीत घेऊन भाजपश्रे÷ाrंनी थोडी नुकसानभरपाई केलेली आहे. आता कोठे पन्नाशी पार केलेले फडणवीस केंद्रात देखील पुढेमागे मोठी जबाबदारी सांभाळू शकतात याची ही जणू नांदीच होय.
फडणवीस आणि गडकरी हे दोघेही नागपूरचे. गडकरी हे केवळ नागपूरचे खासदारच नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खास जवळचे मानले जातात. फडणवीस हे देखील संघाचे लाडके. पण गडकरी म्हणजे थोरली पाती. गोष्ट म्हणाल तर गमतीची पण खरे बघितले तर गंभीरच आहे. कोठेतरी काहीतरी खरेच बिनसलेले आहे. 2014 सालापासून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गडकरी यांचे राजकीय वजन कमी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले आहेत. सरकारातील सर्वात उत्तम मंत्री असा नावलौकिक मिळवून देखील गडकरी यांचे प्रथम जहाज मंत्रालय गेले आणि काही काळापूर्वी त्यांचे छोटे उद्योगासंबंधीचे मंत्रालय देखील काढून घेण्यात आले. दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा कोविड महामारीने हाहाकार माजवला होता तेव्हा गडकरी यांना त्याविरुद्धच्या मोहिमेचे सेनापती बनवावे आणि पंतप्रधानांनी निश्चिन्त राहावे अशा जाहीर सल्लेविना सूचना काही ज्ये÷ नेत्यांनी केल्या होत्या. भरपूर लटपटी-खटपटी करून गडकरी या महामारीच्या मुसक्मया बांधतील असा त्यात विश्वास होता. पण त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली होती. अशावेळी गडकरी नागपुरात राहून आपल्या मतदारसंघात आणि आजूबाजूच्या भागात महामारीविरुद्ध काम करत राहिले. जेव्हा महामारीचा जोर ओसरला तेव्हा झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलात तत्कालीन आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना इतर अकरा कॅबिनेट मंत्र्यांसह काढण्यात आले. सत्ताधारी पक्षातील एकूण रागरंग बघितले तर गडकरी यांच्याबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देखील एक प्रकारे नारळ मिळायला हवा होता. पण तसे झाले नाही याचे कारण देखील गमतीशीर सांगण्यात येते. राजनाथना काढले असते तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संसदीय बोर्डात घ्यावे लागले असते. राजनाथ आणि योगी यांच्यात गेली सहा वर्षे सुरु असलेले शीतयुद्ध जगजाहीर आहे. दिल्लीश्वरांची फारशी कृपा सध्या योगी यांच्यावर नाही असेच राजधानीच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यात कितपत तथ्य आहे ते पुढील काळात दिसून येईल. पंतप्रधानानंतर भाजपमधील ‘नंबर दोन’ चा नेता कोण? अशी काहीशी स्पर्धा असताना योगी पक्षाच्या एव्हढय़ा महत्वपूर्ण समितीत नाहीत हे देखील बोलके आहे.
तीस वर्षांपूर्वी तिरुपती येथे झालेल्या काँग्रेस महाअधिवेशनात कार्यकारिणीच्या सदस्यत्वाकरिता चुरशीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यात शरद पवार आणि अर्जुन सिंग देखील विजयी झाले होते. पण निवडून आलेल्या या मंडळींमध्ये महिला, आदिवासी, मागासवर्गीय एकही नेता नसल्याने तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सर्व निवडून आलेल्या सदस्यांना राजीनामा द्यायला लावला होता. रावसाहेबांनी मग कार्यकारिणी मनोनित केली होती. त्या मनोनित सदस्यांमध्ये पवार आणि सिंग यांचा समावेश होता. आता एवढा काळ गेल्यावर भाजपच्या संसदीय बोर्डात सामाजिक समतोल साधण्यासाठी गडकरी यांना नारळ दिला असल्याचे कारण पुढे केले जात आहे. ते कितपत बरोबर अथवा चूक हे प्रत्येक पक्षकार्यकर्ता तसेच राजकीय कार्यकर्ता जाणतो. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येड्डीयुराप्पा सोडले तर या बोर्डात घेतलेला एकही नवीन सदस्य तालेवार नेता आहे असे म्हणता येणार नाही. कर्नाटकात विधानसभा निवडणूका पुढील वषी होत असताना भाजपची अवस्था नाजूक झालेली आहे अशावेळी येडियुराप्पा यांना गोडीगुलाबीत ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही.
गडकरी कोणाचे ‘होयबा’ होऊ शकत नाहीत हा त्यांचा दोष ही आहे आणि गुण देखील आहे. कधीकधी होयबा नसणे हा मोठा गुण असतो तर कधीकधी तो प्रगतीच्या आड येतो. बदलत्या राजकारणात सरडय़ासारखे रंग बदलणारे कधीकधी फार पुढे जातात हे देखील तितकेच खरे. पण जे आपल्या मतांवर आणि मूल्यांवर ठाम राहतात ते शेवटी युद्ध जिंकतात हे देखील तेव्हढेच खरे. कोणाला किती वाट पाहावी लागते तो कसा लढतो यावर अवलंबून असते. राजकारण नेहेमी बदलत असते. कालचा रंक उद्याचा राजा बनतो. कोण किती दम धरतो आणि कणा ताठ ठेवतो त्यावर सारे असते. गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्याला राजकारणाचा कंटाळा येत चालला आहे. कोठवर राजकारण करायचे? का राजकारण करायचे? राजकारणाच्या बाहेर राहून देखील काम करता येतेच ना, अशा प्रकारची खंत व्यक्त केली होती. आपल्याविषयी काहीतरी कुठेतरी काहीतरी चालले आहे ते चांगले चाललेले नाही, असेच त्यांना सुचवायचे असेल. कारण दिल्लीच्या राजकारणात नको तितके दिलखुलास समजले जाणारे गडकरी त्यांना काय खुपतंय, त्यांना काय सलतय याविषयी जाहीर बोलणाऱयांपैकी नाहीत. पण ते कुढत बसणारे देखील नाहीत. ‘में जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुये में उडाता चला गया’, अशी त्यांची वृत्ती. लाथ मारिन तिथे पाणी काढीन अशी रग त्यांच्या अंगात आहे. ती असल्यानेच ते कोणाला सलत असतील. आता लोकसभा निवडणूक 20 महिन्यांवर आली आहे. राजकारणात रंग भरणे सुरु झाले आहे.
सुनील गाताडे








