आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोमवारी दुपारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, आमदार डॉ. विनय कोरे यांची वारणानगर येथे गडहिंग्लज येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आगामी निवडणुकीसाठी महायुतीसाठी एकजुट दाखवत आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त केली.
आमदार विनय कोरे यांची जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली वारणानगर येथे जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. पाठोपाठ सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार कोरे यांची भेट घेतली. राज्याच्या सत्तेत महायुतीबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष कार्यरत आहे. ही युती गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे सांगत यासाठी चर्चा करण्यात आली.
पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आमदार कोरे यांचे असणारे संबंध विचारात घेऊन गडहिंग्लजच्या राजकारणात ही एकजुट कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सिध्दार्थ बन्ने, युवक शहराध्यक्ष गुंडू पाटील, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, महेश सलवादे, दिपक कुराडे, संतोष चिक्कोडे, संतोष कांबळे, अमर मांगले, महेश गाडवी, रश्मीराज देसाई, उदय परीट यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.








