राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला असून महाविकास आघाडीचा यात सवाल नाही. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नसल्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासन आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने गडहिंग्लजमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचेच फोटो कार्यक्रम पत्रिकेवर छापण्यात आले आहेत. राष्ट्रवादी वगळता महाविकास आघाडीमधील एकाही नेत्याचा फोटो या कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात न आल्यानं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा विसर पडला का अशी चर्चा आता सुरू झाली असताना आमदार हसन मुश्रीफ यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “‘शासन आपल्या दारी’ शासकिय कार्यक्रमांमधील बहुतांशी योजनांचा जन्म मी मंत्री असताना घातला गेला आहे. राजस्व अभियानांतर्गत सरकार या योजना सरकारपर्यंत जनतेपर्यंत पोचवत असे. ही योजना कश्या पद्धतीने राबवली जात आहे हे राज्याला दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “ही योजना यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे हे मी आधीपासून सांगत आलो आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला असून महाविकास आघाडीचा यात सवाल नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही घोषणा केली म्हणून त्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी म्हणून पवारसाहेब आणि अजित दादांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नसून ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही” असे स्पष्टिकरण त्यांनी दिले.