वेणुग्राम अकॅडमीतर्फे जेएनएमसी शताब्दी सभागृहात नाटकाचे आयोजन : पालकांना महत्त्वाचा संदेश
बेळगाव : मोबाईलशिवाय मूल ऐकत नाही, जेवत नाही, ही तक्रार करणाऱ्या पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपणच त्यांना ही सवय लावून भाषेशी त्यांची नाळ तोडत आहोत. त्यांचे बालपण मातीच्या वासात नव्हे तर सॅनिटायजरच्या वासामध्ये गुरफटले आहे. हरवलेले हे बालपण पुन्हा त्यांना परत देण्यासाठी ‘आजीबाई जोरात’ हे नाटक पाहायलाच हवे. वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे क्षितिज पटवर्धन लिखित आजीबाई जोरात या नाटकाचा प्रयोग जेएनएमसी शताब्दी सभागृहात झाला. हे नाटक मुलांच्या गॅझेट्स वापरण्याच्या सवयींवर आधारित असले तरी खऱ्या अर्थाने ते मुलांइतकेच पालकांचेही नाटक आहे. आजच्या मुलांना आजी-आजोबा, मामा, काका भेटत नाहीत, गोष्ट सांगणारी आजी घरी नाही, मग अक्षरांपेक्षा ते मोबाईलशीच खेळू लागतात. भाषेची शेती आणि शब्दांचे मोती घेऊन त्यांना अक्षरांच्या गावामध्ये न्यायचे असेल तर प्रथम पालकांनी गॅजेट्स वापरणे कमी करायला हवे, असा महत्त्वाचा संदेश हे नाटक देते.
आजी आणि मानलेला नातू यांच्यातील संवादांमधून हे नाटक पुढे जाते. समुपदेशन करत करत ही आजी अनेक धमाल गोष्टींमध्ये अक्कूला गुंतवते. आणि त्याच्याही नकळत त्याला मराठी भाषेची गोडी लक्षात आणून देत अक्षर ओळखही करून देते. यातील आजीची मध्यवर्ती भूमिका निर्मिती सावंत यांनी केली आहे. अत्यंत सहज अभिनय आणि देहबोलीतून व्यक्त होणारे अर्थ आणि मुलांसाठी लक्षवेधी ठरेल असा पोशाख यामुळे हे अर्धे नाटक त्यांनी पेलून नेले आहे. त्यांना अक्कू म्हणजे अक्षर झालेला अभिनय बेर्डे, गेमार्ड म्हणजे व्हिलन झालेला जयवंत वाडकर, आई मुग्धा गोडबोले आणि बडबड्या सरपंच अभिजित केळकर यांच्या अभिनयाला मुलांचीही तितकीच उत्तम साथ लाभल्याने हे नाटक मुलांच्या इतकेच पालकांचीही दाद घेऊन जाते. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पुढाकाराने चार मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना या नाटकाचा विनामूल्य आस्वाद घेऊ देण्यात आला.
बालकांच्या प्रश्नांवर भाष्य
बालनाट्या म्हणजे फक्त बालकांचेच नाट्या नव्हे तर बालकांच्या प्रश्नांवर भाष्य करणारे नाटक होय. याचे प्रत्यंतर हे नाटक देते. शिवाय प्रकाश योजना आणि नेपथ्य यामुळे ते अधिक प्रभावी ठरते.









