बेळगाव : चेनस्नॅचिंग प्रकरणी गदग पोलिसांनी गांधीनगर-कोल्हापूर येथील दोघा जणांना अटक केली आहे. ते मूळचे उत्तरप्रदेशमधील असले तरी सध्या कोल्हापुरात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याजवळून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही जोडगोळी बेळगावातही येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. रवी रतनसिंग बावरा (वय 33), मोहम्मदशरीफ ऊर्फ मोहम्मदसाहिल सिद्दीकी (वय 25) दोघेही राहणार उत्तरप्रदेश, सध्या राहणार निगडेवाडी, गांधीनगर-कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. गदगचे जिल्हा पोलीसप्रमुख रोहन जगदीश, पोलीस उपअधीक्षक मूर्तूजा खादरी, सीईएनचे पोलीस उपअधीक्षक महांतेश सज्जन यांच्या मार्गदर्शनाखाली बेटगेरीचे मंडल पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, मुळगुंदचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, गदग ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धरामेश्वर गडेद आदी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. रवी व महम्मदशरीफ हे सिझनमध्ये भेळपुरी विकतात. त्यांचा केटरिंगचाही व्यवसाय आहे. सिझन नसताना वेगवेगळ्या राज्यात फिरून हे दोघे चेनस्नॅचिंग करतात.
ही जोडगोळी केटरिंगसाठी बेळगावलाही आली होती, अशी माहिती मिळाली आहे. केवळ गदगच नव्हेतर बागलकोट, आंध्रप्रदेशमध्येही त्यांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. बागलकोट येथील नवनगर पोलीस ठाणे, आंध्रप्रदेशमधील गुंतकल टाऊन पोलीस ठाणे व अनंतपूर टाऊन पोलीस ठाण्यातही यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याजवळून दोन मोटारसायकली, दोन मोबाईल संच व 91 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. श्रावण मासातील विविध कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या जयलक्ष्मी रामकृष्ण महेंद्रकर, राहणार शिवसाईनगर-गदग यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन करण्यात आले होते. रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.10 वाजता शिवसाईनगर येथील बन्नीकट्टीजवळ ही घटना घडली होती. यासंबंधी गदग येथील बेटगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना आंध्रप्रदेश व बागलकोटमध्ये घडलेल्या आणखी तीन गुन्ह्यांचाही उलगडा झाला. रवी व मोहम्मदशरीफ हे केटरिंगसाठी बेळगावला आले होते. मात्र, बेळगावात त्यांनी गुन्हे केले नाहीत.









