पावणे दोन लाखाचा ऐवज हस्तगत : 8 रोजी झाली होती चोरी
बेळगाव ; आठ दिवसांपूर्वी शाहूनगर येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गदग जिल्ह्यातील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून पावणे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रज्वल नागराज हिरेमनी (वय 21) रा. लक्कलकट्टी, ता. गजेंद्रगड, गदग असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो गवंडी काम करतो. शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी बसवकॉलनी परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. 8 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत शाहूनगर येथील विनोद ईश्वर गाणगेर यांच्या घरी चोरी झाली होती. कडीकोयंडा तोडून पहिल्या मजल्यावरील बेडरुममधील कपाट फोडून 20 ग्रॅमचे दागिने, 20 हजार रुपये रोकड पळविली होती. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. पोलीस निरीक्षक रमेश अवजी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, किरण होनकट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, दीपक सागर, व्ही. डी. बाबानगर, केंपण्णा दोडमनी, गोविंद पुजारी, बसवराज बाणसे, धऱ्याप्पा घेनण्णावर, दयानंद गोटूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रज्वलला अटक करून चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी 20 ग्रॅम सोन्याचे दागिने, 12 हजार रुपये रोकड व दुचाकी असा 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.