वेर्णा – वास्को महामार्गावरील समस्या
झुआरीनगर : जी 20 शिखर परिषदेचे आयोजन गोव्यात होत आहे. त्या दृष्टीने गोव्यातील अनेक महामार्ग हॉटमिक्स करण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर रस्त्याच्या दुभाजकामधोमध विविध प्रकारची फुलझाडे व सजावटीचे झाडे लावून मार्ग आकर्षक करण्यात आलेले आहेत. वेर्णा ते दाबोळी विमानतळ हा चौपदरी महामार्गही असाच सुशोभित करण्यात आलेला आहे. सध्या या महामार्गावर जी 20 परिषदेचे मोठमोठे स्वागत फलक्कही रस्त्याच्या दोन्ही बाजुनी उभारण्यात आलेले आहेत. हे फलक वाहनचालकासाठी असुरक्षित बनलेले आहेत. झुआरीनगर ऑईल टँकिंग जवळ लावलेले फलक जोरदार वाऱ्यामुळे फाटून कपडा रस्त्याच्या बाजुने उडत आहे. परिणामी वाहने चालवताना अडथळा निर्माण होऊन मोठा अपघात होऊ शकतो. जी 20 परिषदेमुळे हा महामार्ग अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विविध ठिकाणचे मोडलेले संरक्षक कठडे दुरूस्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर वळणाच्या जागी नवीन संरक्षक कठडे उभारण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या बाजुने असलेले अतिक्रमणे हटवून त्या जागी कुंपण उभारून रस्त्यावरच्या वर्दळीला आळा घालण्यात आलेला आहे. प्रत्येक नाक्यावरही वाहतुक बेट उभारून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जी 20 परिषदेच्या दृष्टीने महामार्ग पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. परंतु झुआरीनगरातील महामार्गावर जी 20 परिषदेचे फलक वाहतुकीसाठी असुरक्षित बनलेले आहेत.









