तीन दिवस चालणार आरोग्यविषयक परिषद : देशविदेशातील सुमारे 200 प्रतिनिधींचा सहभाग
पणजी : जी 20 इंडिया प्रेसिडेंसी अंतर्गत आरोग्य कृतीगटांच्या दुसऱ्या बैठकीचे आज सोमवार दि. 17 रोजी उद्घाटन होणार आहे. जी 20 सदस्य असलेले 19 देश, 10 आमंत्रित देश आणि 22 आंतरराष्ट्रीय संघटना यांचे मिळून 180 पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याचे अतिरिक्त सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. जी 20 प्रेसिडेंसीचे अध्यक्ष या नात्याने, बळकटीकरणाची आवश्यकता असलेल्या गंभीर क्षेत्रांवर प्रकाश टाकताना, आरोग्यविषयक प्राधान्यक्रम आणि मागील बैठकीतील प्रमुख निर्णयांना पुढे नेणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. आरोग्य सहकार्यामध्ये गुंतलेल्या विविध बहुपक्षीय मंचांवर चर्चेत एकात्मिक कृतीच्या दिशेने काम करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणार
जी20 इंडिया प्रेसिडेन्सीच्या आरोग्य ट्रॅकमध्ये चार आरोग्य कार्यगटांच्या बैठका आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक यांचा समावेश असेल. भारताने जी20 चर्चेला समृद्ध, पूरक आणि समर्थन देण्यासाठी बैठकांसह चार बाजूंच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रदर्शन करणे हा यामागचा उद्देश असून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या बैठका आयोजित करण्यात येतील. दि. 18 व 19 एप्रिल रोजी गोव्यात होणारी बैठक हाही त्याचाच भाग असेल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल हेल्थवर एक साइड इव्हेंट आयोजित करण्यात येणार असल्याचे अगरवाल पुढे म्हणाले.
बैठकीत आरोग्यविषयाला प्राधान्य
या बैठकीच्या प्रथम प्राधान्यात आरोग्य, आपत्कालीन प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद यांचा समावेश असेल. दुसऱ्या प्राधान्यात सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणारे वैद्यकीय उपचार आणि उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करून औषध निर्मिती क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यात येईल.
डिजिटल हेल्थ इनोव्हेशन्सवर प्रकाशझोत
तिसऱ्या प्राधान्यक्रमात डिजिटल हेल्थ इनोव्हेशन्स आणि सोल्युशन्स, सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजला मदत करणे तसेच हेल्थकेअर सेवा वितरण सुधारण्यासाठी ’अतिथी देवो भव’ या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित समृद्ध विविधता आणि संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित प्रतिनिधी गोव्याच्या निसर्गसौंदर्यासोबतच येथील उदार आदरातिथ्य आणि पाक संस्कृतीचाही आनंद व अनुभव घेऊ शकतील. गतवर्षी दि. 1 डिसेंबर रोजी भारताने जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारले. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जी 20 मध्ये इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील या तीन विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.
’एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जी20 भारताचे अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल, याचा पुनऊच्चार केला आहे. त्यानुसार त्यांनी अनावरण केलेल्या ’एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’, ’वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पना म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित, जगभरातील लोकांसाठी महामारीनंतरचे जग तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी एक आकर्षक वाक्य आहे.









