ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात दोन दिवसीय G-20 परिषदेला आजपासून सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सकाळच्या सत्रात या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत 20 देशांचे 66 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत शहरांचा विकास ते शाश्वत जीवनशैली यावर एकूण सात सत्र होणार आहेत.
दुपारी 1 ते 3 या सत्रात जगभरातील पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्यासमोरची आव्हाने यावर चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय लोककला, लोकसंगीत व लावणी असे कार्यक्रम करून मराठी संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे.
दरम्यान, उद्घाटनानंतर राणे म्हणाले, मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की G-20 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो. मोदींच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत. शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील.









