जगभरातून 40 प्रतिनिधीमंडळे, 13 आंतरराष्ट्रीय संघटनांचाही सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान मिळाल्यानंतर आता या संघटनेच्या सदस्यदेशांच्या विदेश व्यवहार मंत्र्यांच्या महापरिषदेला येथे आज गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जी-20 सदस्य देशांसह 40 प्रतिनिधीमंडळे आणि 13 जागतिक संघटनांचे प्रतिनिधी येथे पोहचत आहेत. जी-20 परिषदेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी परिषद ठरण्याची शक्यता आहे.
या परिषदेचे आयोजन राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात होणार असून ती दोन दिवस चालणार आहे. या परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन महासंघ, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्थान, इंडोनेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या सदस्य देशांचा सहभाग आहे. याशिवाय बांगला देश, ईजिप्त, मॉरिशस, नेदरलँडस्, नाईजेरिया, ओमान, सिंगाप्रूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे विदेश व्यवहार मंत्रीही समाविष्ट होणार आहेत. या परिषदेचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.
स्नेहभोजनाचा कार्यक्रम
प्रत्यक्ष परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी बुधवारी रात्री भारताच्या वतीने सर्व प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. जी-20 अध्यक्षपदाच्या काळात भारतात होत असलेली ही दुसरी मंत्रीस्तरीय परिषद आहे. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सर्व सदस्य आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भरगच्च कार्यक्रम
आज गुरुवापासून दोन दिवस परिषदेचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. युपेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घेणे हा सर्वातप मोठा आणि सर्वाधिक आव्हानात्मक कार्यक्रम आहे. या युद्धाला आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. पण हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्याने कोणीही माघार घेण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार नाही. अशा स्थितीत जी-20 ने हे उत्तरदायित्व स्वीकारावे, यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
भारताचे महत्व वाढणार
सध्या जग मंदीच्या विळख्यात असून बहुतेक देशांचा विकासदर घटला आहे किंवा कमी झाला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होत असला तरी या कठीण परिस्थितीतही भारताचा विकासदर जगात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत ही परिषद भारतात होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक महत्वपूर्ण देश म्हणून पुढे येण्यास ही परिषद सहाय्यभूत ठरण्याची शक्यता आहे.
वसुधैव कुटुंबकम् हे घोषवाक्य
‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात, सारे जग हे एक कुटुंब आहे, हे भारतीय संस्कृतीतील तत्व या महापरिषदेचे घोषवाक्य म्हणून निवडण्यात आले आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा परिषदेचा निर्धार आहे. याच तत्वज्ञानाच्या आधारे रशिया-युपेन युद्ध थांबविण्याचा प्रयत्न परिषदेकडून केला जाणार आहे. भारतानेही या संदर्भात आपले सहकार्य देऊ केले आहे. युद्ध थांबविण्याच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये आमचा सहभाग असेल असे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.









