अॅनालिसिस ग्रूपच्या स्थापनेचा प्रस्ताव : संसदीय समितीने दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सशस्त्रदलांमध्ये एक फ्यूचर वॉरफेयर फंडची स्थापना करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली असल्याचे संसदेच्या एका समितीने म्हटले आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याच्या प्रभावांचे अध्ययन करण्यासाठी एका अॅनालिसिस ग्रूपच्या (विश्लेषण समूह) स्थापनेचा प्रस्ताव असल्याचेही सांगण्यात आले.
भाजप खासदार राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षणविषयक स्थायी समितीने स्वत:च्या अहवालात याविषयी माहिती दिली आहे. सशस्त्र दलांची एकीकृत थिएटर कमांडमध्ये पुनर्रचना करण्यावर विचारविनिमय सुरू आहे आणि संचालन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उपयुक्त संरचनात्मक स्वरुपाला अंतिम रुप देण्यापूर्वी विविध स्तरांवर याची पडताळणी केली जात असल्याचे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एकीकरण एक महत्त्वपूर्ण सुधारणा असल्याने अनेक जटिल मुद्द्यांवर व्यापक स्वरुपात तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे संरक्षण मंत्रालयाने समितीला सांगितले आहे. 2025-26 साठी संरक्षण मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर सातवा अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे.
2025-26 साठी संरक्षण मंत्रालयाचा एकूण खर्च 6,81,210.27 कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या एकूण खर्चाच्या (50.65 लाख कोटी रुपये) जवळपास 13.45 टक्के हे प्रमाण आहे. तसेच हा आकडा सर्व मंत्रालयांमध्ये सर्वाधिक आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अहवालातून सशस्त्रदलांमध्ये एक ‘फ्यूचर वॉरफेयर फंड’ची स्थापना करण्यात आल्याचे कळले आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याच्या प्रभावाचे अध्ययन करण्यासाठी एक विश्लेषण समुहाच्या स्थापनेचाही प्रस्ताव आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सादरीकरणानुसार सशस्त्र दलांच्या वर्तमान कमांडच्या विस्तारासाठी सध्या कुठलाही प्रस्ताव पुढे सरकविला जात नसल्याचे समजते. एकीकृत थिएटर कमांड उत्तम समन्वय आणि दलाच्या एकीकृत वापराची सुविधा प्रदान करणार आहे, यामुळे संचालन दक्षता वाढेल आणि साधनसामग्रीचा प्रभावी वापर करता येणार असल्याचे समितीने स्वत:च्या अहवालात म्हटले आहे.









