‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. हे विष चाखाल तर तुमचा मृत्यू होईल’ असे वक्तव्य काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. कर्नाटकची विधानसभा निवडणूक अगदी जवळ आली असताना आणि प्रचाराला रंग चढत चालला असताना एका 80 वर्षांच्या ज्येष्ठ आणि तोलदार नेत्याने असे वक्तव्य करावे, हे केवळ आश्चर्यकारच नाही, तर अत्यंत बेजबाबदार आहे. कोणत्याही महत्वाच्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातले नेते अशी विधाने का करतात, हा एक राजकीय संशोधनाचा विषय ठरु शकेल. हा इतिहास बराच प्रदीर्घ आहे. 2007 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत के सौदागर’ म्हटले आणि प्रचाराची दिशाच पालटली. सोनिया गांधीचे हे बोल भाजपने शेवटपर्यंत प्रचारात धरुन ठेवले आणि भरघोस मते आणि तशाच जागा मिळवून सत्ताही मिळविली. 2018 ची गुजरातची विधानसभा निवडणूक खरेतर भाजपसाठी आव्हानात्मक होती. कदाचित भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागेल, अशीं निदान वातावरणनिर्मिती तरी करण्यात आली होती. तेवढय़ात काँगेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधान मोदींसंबंधी ‘नीच’ हा शब्द उच्चारायची बुद्धी झाली आणि भाजपच्या हाती आयतेच कोलित मिळाले. तीही निवडणूक त्याच्या पदरात पडली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा राहुल गांधींनी दिली. ती सपशेल अपयशी ठरली आणि काँगेसने पुन्हा एकदा माती खाल्ली. आता, वास्तविक कर्नाटकाचा निवडणूक काँगेससाठी महत्वाची आहे. स्वतः खर्गे याच राज्यातील आहेत. विधानसभा निवडणूक आठ वेळा आणि लोकसभेची निवडणूक दोन वेळा त्यांनी याच राज्यातून जिंकली आहे. अशा अनुभवी आणि बुजुर्ग नेत्याने मतदानाचा दिवस ऐन तोंडावर आला असताना असे निरर्गल विधान करावे, याचा अर्थ काय घ्यायचा ? वरील तीन विधानांपेक्षाही खर्गे यांचे हे विधान अधिक विषारी आहे. पंतप्रधान मोदी यांची धोरणे, विचारधारा किंवा कार्यपद्धती यावर मतभेद असू शकतात. एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे टीकात्मक दृष्टीने पाहिले जाऊ शकते. पण त्यांना ‘विषारी सापा’ची उपमा देणे, हे त्यांचा टोकाचा द्वेष करणाऱयांसाठी सुखावह असले तरी काँगेससाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरु शकते. हे कदाचित खर्गे यांच्या नंतर लक्षात आले असावे, किंवा कोणीतही लक्षात आणून दिले असावे. त्यामुळे सारवासारवी करताना आपण पंतप्रधान मोदींसंबंधी असे बोललोच नव्हतो, असा खुलासा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो लटका आणि लंगडा होता. कारण त्यांनी प्रत्यक्ष नाव घेऊनच हे विधान केल्याचे वृत्त प्रत्येक वृत्तवाहिनीने आणि सोशल मिडियावरही प्रसिद्ध केले आहे. अशाच एका मानहानीकारक विधानामुळे काँगेसचे श्रेष्ठी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊन खासदारपदही गमवावे लागले आहे. नुकताच हा प्रसंग घडला असतानाही, ज्यांच्यावर काँगेसचे भवितव्य उजळविण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे, त्यांनी असे विधान करणे, हे खरोखरच अद्भूत म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार यांच्या आजवरच्या कार्यावर किंवा धोरणांच्या यशापयशावर टीका करणे हे प्रत्येक विरोधकाचे कर्तव्यच आहे. लोकशाहीचा तो गाभा म्हणावा लागेल. तथापि, ते जणूकाही स्वतःचे व्यक्तीशः हाडवैरी आहेत, अशा पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर उतरुन विधाने करणे हे खर्गे यांच्यासारख्या शांत आणि संयमी मानल्या गेलेल्या नेत्याला शोभते काय ? अशा विधानांमधून एक निराळाच संदेश ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत जाऊ शकतो. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांची इतकी धास्ती घेतली आहे, की त्यांच्याविरोधात व्यक्तीगत पातळीवर अपशब्द उच्चारल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, अशी जर मतदारांची भावना झाली, तर खर्गे यांच्या या विधानाचा परिणाम काय होऊ शकेल, याची कल्पना केलेली बरी. ‘लिंगायत मुख्यमंत्री भ्रष्ट असतात’ असे विधान नुकतेच खर्गे यांच्याइतकेच ज्येष्ठ काँगेस नेते सिद्धरामय्या यांनी केले होते. कर्नाटकात भ्रष्टाचाराचे आरोप अनेक मुख्यमंत्र्यांवर झाले आहेत. ते सर्व लिंगायत समाजाचेच होते असे नव्हे. लिंगायत नसलेल्या मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत काय ? ज्या नेत्यांकडून सभ्य राजकारणाची अपेक्षा सर्वसामान्य मतदार करतात, निदान त्यांनीतरी आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक नाही काय ? कर्नाटकात या निवडणुकीत विजयाचा दावा प्रत्येक पक्ष करीत आहे. काँगेसचे काही नेते तर आपल्या पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, अशी भाषा करु लागले आहेत. इतक्या मोठय़ा विजयाचा आत्मविश्वास असेल तर अशी ‘असांसदीय’ आणि त्याज्य भाषा कशासाठी ? या विधानांचा नेमका परिणाम या निवडणुकीवर काय होणार आहे, हे समजून येण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत. तथापि, जो पक्ष आतापासूनच विजयाची अपेक्षा करत आहे, त्याने आतापासूनच शालीनता दाखविली तर काय बिघडणार आहे ? मतदारांच्या मनात नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणे किंवा ओपिनियन पोल विश्वासार्ह असतातच असे नाही. शिवाय आतापर्यंत जी सर्वेक्षणे समोर आली आहेत, ती वस्तुस्थिती स्पष्टपणे दर्शविण्यापेक्षा गोंधळ वाढविणारीच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहून आतापासून बेताल भाषा करणे हे निदान ज्येष्ठ नेत्यांनी तरी टाळावयास नको काय ? हे पथ्य केवळ काँगेससाठीच आहे असे नाही, तर ते प्रत्येक पक्षासाठी आहे. एकदा का एखाद्या मान्यवर नेत्याने संयम सोडला, की मग अशा वक्तव्यांची माळच लागते. राजकीय वातावरण बिघडू लागते. प्रचार दिशाभ्रष्ट होतो. नंतर पश्चात्ताप करुन काहीही हाती लागत नाही. आधीच स्वतःला नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. आपल्या नेत्यांना हे समजणार कधी ?
Previous Articleबीसीसीआयकडून महिलांच्या वार्षिक कराराची घोषणा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








