हेस्कॉमचे दुर्लक्ष : नागरिकांच्या जीवाला धोका
बेळगाव : कपिलेश्वर उड्डाण पुलाखालील तांगडी गल्लीच्या कॉर्नरवर फ्यूजपेटी उघड्यावर पडली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षपणाचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तातडीने फ्यूजपेटी बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. रहदारीच्या ठिकाणीच फ्यूजपेटी उघडी असल्याने लहान मुलांसाठी देखील धोका उद्भवू शकतो. लहान मुले खेळण्यासाठी खांबाजवळ जात असतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळा देखील जवळ आला आहे. त्यामुळे विद्युतप्रवाह निर्माण होऊन पावसाच्या पाण्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या ठिकाणी मद्यविक्री करणारी दुकाने असल्याने मद्य ढोसण्यासाठी मद्यपींची वर्दळ असते. हे मद्यपी मद्य खरेदी करून रेल्वेरूळावर बसून मद्यप्राशन करतात. त्यामुळे मद्याच्या नशेत उघड्या फ्यूज पेटीजवळ गेल्यास धोका उद्भवतो. त्यामुळे तातडीने फ्यूजपेटी बंद करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.









